विटा : वार्ताहर
कडकनाथ प्रकरणात फसवणूक झालेल्या खानापूर तालुक्यातील 32 शेतकर्यांनी शुक्रवारी विटा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले.पोलिसांनी ते दाखल करुन घेऊन त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. शेतकर्यांनी तक्रार अर्ज दाखल करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी केली होती.
तालुक्यातील अनेक गावात या घोटा़ळ्याचे लोण पसरले आहे. अनेकांनी व्याजांने पैसे काढून भरले आहेत. आज बत्तीस शेतकर्यांच्या तक्रारी विटा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या. तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या प्रत्येक शेतकर्याने त्याची तक्रार त्यांच्या हद्दीतील पोलिस स्टेशनमध्ये द्यावी. तेथे तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असेल तर आमच्याशी संपर्क करावा. आम्ही प्रत्येक शेतकर्याला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी आहोत असे आवाहन सुतार यांनी केले आहे.
खानापूर तालुक्यातील लेंगरे, भुड, मादऴमुठी, बामणी, चिखलहोऴ परिसरातील शेतकर्यांनी आज तक्रारी दाखल केल्या. यावेऴी भास्कर पवार, महादेव चव्हाण,विकास नेर्ले,नवनाथ निकम, नमिता कांडेसर, शोभा कांडेसर, अशोक निकम, दत्तात्रय निकम, प्रमोद शेंडगे, बालाजी मोहिते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
पोलिसांचा कामचुकारपणा : सुतार
कडकनाथ प्रकरणात खानापूर तालुक्यातील फसवणूक झाल्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. कुणाची अंडी नेली नाहीत, कुणाचे पक्षी नेले नाहीत, कुणाला खाद्य देतो म्हणून पैसे नेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. मात्र पोलिस स्वतःचे काम हलके करण्यासाठी चुकारपणा करीत आहेत, असा आरोप सुतार यांनी केला.