Mon, Jul 13, 2020 08:19होमपेज › Sangli › मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ‘कडकनाथ’ कोंबड्या भिरकावल्या

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ‘कडकनाथ’ कोंबड्या भिरकावल्या

Published On: Sep 17 2019 1:58AM | Last Updated: Sep 17 2019 1:58AM
सांगली : प्रतिनिधी
‘कडकनाथ’ कोंबडी पालन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी  संघटनेने सोमवारी गनिमी काव्याने आंदोलन केले. पलूस तालुक्यातील दह्यारी फाट्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’ कोंबड्या भिरकावल्या; अंडीही फेकली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. 

सांगलीत कर्मवीर चौकातील नियोजित सभा होताच मुख्यमंत्री कोल्हापूर दौर्‍यासाठी रवाना झाले. त्यावेळी एका महिलेने पूरग्रस्तांना मदत केली नाही, असा आरोप करीत ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन या महिलेलाही ताब्यात घेतले. याशिवाय मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याच्या तयारीत असलेल्या संजयनगरमधील दहा जणांना राममंदिर चौकात पोलिसांनी अटक केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सोमवारी सकाळी सांगली जिल्ह्यात आगमन झाले. भाजपतर्फे यात्रेचे स्वागत करण्याची तयारी सुरू होती. तर दुसरीकडे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिल्याने पोलिस यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेऊन होती. 

यात्रा पलूस तालुक्यात गेली. दह्यारी फाट्यावरून ही यात्रा निघाली होती. तेवढ्यात उसामध्ये लपून बसलेले  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अचानक बाहेर आले. त्यांच्या हातात कडकनाथ कोंबड्या व अंडीही होती. त्यांनी यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला नाही. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यासह यात्रेवर कोंबड्या भिरकल्या; अंडीही फेकली. तरीही ताफा थांबला नाही. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनांखाली सापडून कोंबड्या मरण पावल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्याचा  प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत.

कडकनाथप्रकरणी कारवाई करावी, जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी द्यावे. पूरग्रस्तांना मदत करावी, अशा मागण्याही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केल्या.  
सांगलीत कर्मवीर चौकात मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी पूरग्रस्तांना मदत केल्याचे सांगितले. सभा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा कोल्हापूरला जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात एक सामाजिक महिला कार्यकर्ती ताफ्याच्या आडवी गेली. तिने ‘पूरग्रस्तांना शासनाने कोणतीही मदत केली नाही. मुख्यमंत्री सभेत खोटे बोलले’, असा आरोप करून ताफा अडविण्याचा  प्रयत्न केला. बंदोबस्तास असलेले पोलिस पुढे धावले. पण पोलिसांना तिने ‘मला हात लावायचा नाही’, असे सांगितले. त्यामुळे महिला पोलिस अधिकार्‍यांना बोलावून तिला ताब्यात घेण्यात आले. 

दहा जणांना अटक

पूरग्रस्तांना शासनाने कोणतीही मदत केली नाही, असा आरोप करून मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांना शहर पोलिसांनी राम मंदिर परिसरात प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली. वासीम जावेद बलबंड (वय 31), मोहसीन मुबारक बेळगी (30, दोघे रा. संजयनगर), तौसीक रशीद मुन्शी (30), रईक अब्दुलमजीद मुन्शी (31), अय्याज शकील शेख (30), इमाम शकील मुल्ला (29), गौस फकरुद्दीन शेख (31), अझर दाऊद लांबे (31), आश्पाक इकबाल सय्यद (29), व मुजफ्फर सलीम बागवान (30, सर्व रा. रमामातानगर, काळे प्लॉट, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. पाचवा मैल येथेही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना अटक करण्यात आली. कडकनाथप्रकरणी आंदोलनाचा इशारा देणार्‍या पलूस तालुक्यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले होते. 

तानाजी सावंतसह चौघे ताब्यात

मुख्यमंत्र्यांची कर्मवीर चौकात सभा होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याच्या चबुतर्‍याभोवती भाजपने पक्षाचेे झेंडे लावले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तानाजीराव सावंत, आशीष कोरी यांनी पोलिसांची भेट घेतली. सभेला आमचा विरोध नाही. पण चबुतर्‍याभोवती लावलेले झेंडे काढावेत, अशी मागणी केली. यावरून वादही झाला. त्यामुळे पोलिसांनी सावंत यांच्यासह चौघांना ताब्यात घेतले.