होमपेज › Sangli › जयंत पाटील, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे कोट्यधीश उमेदवार

जयंत पाटील, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे कोट्यधीश उमेदवार

Published On: Oct 04 2019 1:50AM | Last Updated: Oct 03 2019 10:57PM
सांगली : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे बंडखोर उमेदवार इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, मंत्री सुरेश खाडे हे कोट्यधीश श्रीमंत उमेदवार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेच्या विवरणपत्रातून हे स्पष्ट झाले आहे. 

आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जानुसार सर्वाधिक श्रीमंत सुधीर गाडगीळ आहेत. त्यांची मालमत्ता 47 कोटी 86 लाख 53 हजार 750 रुपये  आहे. त्यानंतर जयंत पाटील यांची 16 कोटींची मालमत्ता आहे.
पिढीजात सराफी व्यवसाय असलेल्या गाडगीळ यांची जंगम मालमत्ता 5 कोटी 26 लाख  आहे. स्थावर मालमत्ता 41 कोटी 86 लाख 27 हजार 750 रुपये  आहे. त्यांच्याकडे एकमेव चारचाकी गाडी आहे. 
 जयंत पाटील  आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 16 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 13 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मात्र जयंत पाटील यांच्याकडे एकही वाहन नाही. त्यांच्याकडे 1 किलो 128 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. कासेगाव, आमणापूर आणि नरवाड येथे त्यांची शेती आहे. कासेगाव, सांगली या ठिकाणी बिगरशेती जमीन आहे.पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडे 3 कोटी 22 लाख रुपयांची मालमत्ता होती. 

इस्लामपूरचे अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील व त्यांच्या पत्नीच्या नावावर 7 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या नावावर 60 लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 25 तोळ्यांचे दागिने आहेत.  पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा एक गुन्हा नोंद आहे. 

शिवसेनेचे इस्लामपूर मतदारसंघातील उमेदवार गौरव नायकवडी यांच्याकडे 33 लाख 64 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर एकही स्थावर मालमत्ता नाही. 8 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. त्यांच्यावर 17 लाख 91 हजार रुपयांचे कर्ज आहे. नायकवडी यांच्यावर आष्टा, कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.

मिरजेतील भाजपचे उमेदवार सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे  यांच्या नावे एकूण 5 कोटी 60 लाख रुपये मालमत्ता आहे. शिराळ्याचे भाजपचे उमेदवार आमदार शिवाजीराव नाईक व पत्नी सुनंदा नाईक यांची एकूण मालमत्ता 4 कोटी 29 लाख 33 हजार 373 रुपये इतकी आहे. त्यामध्ये जंगम 75लाख 36 हजार 316 रुपये आणि स्थावर - 3 कोटी 53 लाख 97 हजार 60 रुपये इतकी आहे. 

जतचे भाजपचे उमेदवार विलासराव जगताप व त्यांच्या पत्नी सौ. उर्मिला यांच्या नावे 6 कोटी 57 लाख 14 हजार 369 रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये रोख 4.50 लाख रुपये, 1 कोटी 6 लाख 38 हजार 749 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. जगतापांची स्थावर मालमत्ता फक्‍त पत्नी उर्मिला यांच्या नावे  5 कोटी 46 लाख 25 हजार 620 रुपये इतकी आहे. त्यांचे पीक कर्ज - 8 लाख 44 हजार रुपये इतके आहे. दोघांचे वार्षिक उत्पन्न 22 लाख 56 हजार रुपये इतके आहे. 

काँग्रेसचे जतचे उमेदवार विक्रम सावंत  व पत्नी वर्षा सावंत यांच्या नावे एकूण मालमत्ता 4  कोटी 82 लाख 57 हजार 452 रुपये इतकी आहे. त्यामध्ये विक्रम यांच्या नावे जंगम  - 1 कोटी 30 लाख 85 हजार 570 रुपये, तर पत्नी वर्षा यांच्या नावे 29 लाख 59 हजार 516 रुपये इतकी मालमत्ता आहे. विक्रम यांच्या नावे  2 कोटी 81 लाख 35 हजार 221 रुपये तर वर्षा यांच्या नावे 40 लाख 77 हजार 145 रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 17 लाख रुपये इतके आहे. त्यांचे कर्ज - 17 लाख 38 हजार रुपये इतके आहे. 

तासगावच्या उमेदवार आमदार सुमन पाटील यांची मालमत्ता 1 कोटी 54 लाख 64 हजार 119 रुपयांची  आहे. त्यामध्ये  जंगम मालमत्ता  37 लाख 42 हजार 504 रुपयांची आणि  स्थावर मालमत्ता 1 कोटी 17 लाख 21 हजार 615 रुपयांची आहे. त्यांच्या नावे 2 लाख 3 हजार रुपये कर्ज आहे. त्यांच्या नावावर एक महिंद्रा जीप आहे.  5 लाख 69 हजार 921 रुपये किंमतीचे  161 ग्रॅम  सोने आहे.