Sat, Jul 04, 2020 02:01होमपेज › Sangli › मित्राच्या प्रेम प्रकरणात मध्यस्थी; युवासेना अध्यक्षाचा खून

खानापूर तालुका युवासेना अध्यक्षाचा खून

Published On: Feb 16 2019 5:17PM | Last Updated: Feb 16 2019 5:17PM
विटा (सांगली) : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील जाधववाडी येथे मित्राच्या प्रेम प्रकरणाचा सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या खानापूर तालुका युवासेना अध्यक्ष आकाश शशिकांत भगत (वय - २२) व त्याचा मित्र विपुल विकास जाधव (वय - १९, दोघेही रा. खानापूर) यांच्यावर शुक्रवारी रात्री चाकूहल्ला झाला होता. या हल्ल्यात युवासेना अध्यक्ष आकाश भगत याचा मृत्यू झाला. तर विपुल जखमी झाला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीसह पिता पुत्रांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रमोद विठ्ठल कदम याने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रमोद कदम व आकाश भगत हे मित्र होते. आदिनाथ भोसले व प्रमोद भगत यांच्यात एका मुलीला प्रपोज केल्याच्या कारणावरून शुक्रवारी, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी येथील हनुमान मंदिर चौकात वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी आकाश भगत, विपुल जाधव व त्याचे मित्र जाधववाडी येथे गेले. यावेळी आदिनाथ व त्याच्यासोबत त्याचे वडील दिलीप भोसले व अल्पवयीन मुलगा असे तिघे मंदिर परिसरात उभे होते. यावेळी दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली. 

यावेळी आकाश भगत व विपुल जाधव यांच्यावर आदिनाथ भोसले याने त्याचे वडील व अन्य एकाच्या मदतीने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विटा पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या संयुक्त पथकाने तिन्ही आरोपींना केवळ बारा तासातच अटक केली.