इस्लामपूर : मारूती पाटील
एकीकडे अतिरिक्त ऊस व एफआरपीचा प्रश्न भेडसावत असला तरी ऊस क्षेत्रात घट होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. वाळवा तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस क्षेत्रात तब्बल 2 हजार हेक्टरची वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार आहे. वाळवा तालुक्यात कृष्णा-वारणा नद्यांच्या योगदानामुळे येथे उसाचीच प्रामुख्याने शेती केली जाते. आता तरी आधुनिक पध्दतीने शेती केली जात असल्याने कमी क्षेत्रात उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची जणू स्पर्धाच निर्माण झाली आहे. खासगी, सहकारी जलसिंचन योजनांचे जाळे निर्माण झाल्याने बागायती क्षेत्रात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.
तालुक्यात सन 2015-16 ला 27 हजार 730 हेक्टरवर तर 2016-17 ला 26 हजार 660, 2017-18 ला 27 हजार 286 हेक्टर ऊस लागवड झाली. आता 2018-19 च्या गळीत हंगामासाठी तब्बल 29 हजार 150 हेक्टरवर उसाची लागवड आहे. 11 हजार 850 आडसाली 5 हजार 417 पूर्व हंगामी, 3 हजार 622 सुरू तर 8 हजार 231 खोडवा क्षेत्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत ऊस क्षेत्रात 2 हजार हेक्टरने वाढ झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच आडसाली लागणींचा धडाका सुरू आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात ऊस क्षेत्रात आणखीन वाढ होणार आहे.
शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळला...
उसाला अपेक्षित भाव मिळत नसला तरी भाजीपाला व इतर शेतीमालाच्या तुलनेत ऊस शेतीच परवडते, असा शेतकरी वर्गाचा समज झाला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकाकडे वळलेला शेतकरी यावर्षीपासून पुन्हा ऊस शेतीला पसंती देऊ लागला आहे. यावर्षी जून महिन्यातच तालुक्यात आडसाली लागणींचा धडाका सुरू झाला आहे.