Mon, Dec 09, 2019 05:39होमपेज › Sangli › साखरेचे ओझे तरीही ऊस लावणीचा धडाका

साखरेचे ओझे तरीही ऊस लावणीचा धडाका

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 07 2018 11:49PMसांगली : शशिकांत शिंदे

उसाचे क्षेत्र आणि उतारा वाढल्याने राज्यात यंदा 102 लाख  टन साखर उत्पादन झाले. हंगाम अद्याप सुरूच असून साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखर शिल्लक राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याचवेळी  जिल्ह्यात मात्र ऊस लागणीचा धडाका सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 2 लाख 13 हजार एकर उसाची नोंद झाली आहे. 

दरम्यान, यंदा झालेले विक्रमी उत्पादन आणि पुढील वर्षी वाढणारे क्षेत्र यामुळे ऊस दरात घसरण होऊन पुढील हंगामात शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याचा धोका आहे. याची जाणीव शेतकर्‍यांनी ठेवण्याची गरज आहे.

मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार  वस्तूंचे दर ठरतात. मात्र व्यापार्‍यांप्रमाणे  याची माहिती अनेक शेतकर्‍यांना असत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आहे. सरकारही त्याबाबत जागृती करताना दिसत नाही. कारण यंदा देशात साखरेचे अपेक्षापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. सुमारे 282 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.  

राज्यात 650 लाख  टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज असताना मार्च अखेर 99 लाख  टन गाळप होऊन 102 लाख  टन साखरेचे उत्पादन झाले.  अजून 60 लाख टन गाळप होईल, असा अंदाज असून साखर उत्पादन विक्रमी 107 लाख टनापर्यंत जाईल, असा अंदाज आहे.  जागतिक बाजारात देखील साखरेचे उत्पादन वाढल्याने   दर गडगडले आहेत. त्यामुळे बहुसंख्य साखर कारखाने  एफआरपीनुसार ऊस बिल देऊ शकलेले नाहीत.  हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील वर्षीही उसाचे चांगले उत्पादन होईल, असा अंदाज आहे. साखरेचा उठाव न झाल्यास साखरेचे दर आणखी घसरण्याचा धोका आहे. त्याचा शेतकर्‍यांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात सन 2016-17 या वर्षात 72 हजार 358 हेक्टर उसाचे क्षेत्र होते. सन 20 17-18 साठी देखील ते  80 हजार हेक्टर राहिले. मात्र सन 2018-19 च्या हंगामासाठी मात्र  76 हजार 670 हेक्टर अपेक्षित असताना 85 हजार 513 हेक्टरपर्यंत उसाची नोंद झाली आहे. अर्थात नोंद नसलेला ऊस वेगळाच आहे.

कृष्णा - वारणा टापूत  ऊस पिकतो. मात्र आता पूर्व भागात पाणी योजना झाल्याने उसाचे क्षेत्र वाढत आहे. उसापासून इथेनॉलसारखे इतर उपपदार्थ तयार करणे गरजेचे आहे. तरच साखरेचे दर स्थिर ठेवता येणे शक्य होईल. ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्राचा  वापर करुन उत्पादन खर्च कमी करायला हवा. तरच ऊसउत्पादक या  संकटातून सावरण्याची शक्यता आहे.