Sat, Jul 11, 2020 13:51होमपेज › Sangli › दुर्गम शिराळ्यात आरोग्य सेवा दुर्लभ

दुर्गम शिराळ्यात आरोग्य सेवा दुर्लभ

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 9:04PMकोकरूड : नारायण घोडे 

शिराळा तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये व 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यातून मोफत औषध पुरवठा होत आहे. तरीही शिराळा तालुक्यातील आरोग्य केंद्राकडे येणार्‍या रुग्णांची संख्या खासगी रुग्णालयांच्या प्रमाणात फारच कमी आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून रहावे लागत आहे. काही ठिकाणी अद्यापही बोगस डॉक्टर आहेत. शिरशी, अंत्री, मांगले, सागाव, कोकरूड, चरण व मणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तर कोकरूड व शिराळा येथे ग्रामीण रुग्णालये आहेत. बिळाशी व आरळा येथे आयुर्वेदिक दवाखाने आहेत. तर 45 उपकेंद्रे आहेत. या सर्व रुग्णालयात 14 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. परंतु यातील काही ठिकाणी अजूनही वेळेवर डॉक्टर येत नाहीत. यामुळे रुग्णांना सेवा मिळत नाही. यामुळेच खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. परिणामी रुग्णांना महागड्या औषधांचा सामना करावा लागत आहे. 

शिराळा तालुक्यात 202 जणांचा स्टाफ मंजूर आहे. त्यापैकी 44 पदे रिक्त आहेत. कोकरूड आणि शिराळा येथे जुन्या जागेत एकत्रच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत. यामुळे कोणाला वेळेचे बंधन नाही. तालुक्यात अनेक पाडे दुर्गम भागात आहेत. याठिकाणी वैद्यकीय सेवेचा पत्ताच नाही. येथील आजारी पडलेल्या व्यक्तीला 8 ते 10 किलोमीटर डोलीतून आणावे लागते.शिराळा तालुक्यात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका आहे. अपघातग्रस्तांना तातडीने उपचार देण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जातो. यामुळे रुग्णांना सेवा मिळत आहे. तशा सेवा आणि सुविधा शासनाच्या डॉक्टरांकडून मिळाव्यात अशा अपेक्षा रुग्णांच्या आहेत. पण त्या मिळत नाहीत असेच दिसत आहे. शासनाच्या विविध योजनांतून लाखो रुपयांचा निधी आरोग्य विभागाला मिळत आहे. परंतु खर्‍या लाभार्थ्यापर्यंत हा निधी पोहोचतो का,  हा सवाल आहे.  

एकीकडे खासगी रुग्णालयात रुग्णांना लुबाडले जात असताना व दुसरीकडे शासकीय रुग्णालयात मोफत उपचार व औधष पुरवठा होत असतानाही रुग्ण तिकडे पाठ फिरवत आहेत. याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यक आहे.

कर्मचारी कधीही येतात, कधीही जातात

शिराळा तालुका आरोग्य अधिकारी पद तर गेल्या अनेक वर्षापासून रिक्तच आहे. यामुळे कोण कर्मचारी कधी येतो आणि कधी जातो हे समजतच नाही. यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत, अशा तक्रारी वाढत आहेत. कर्मचार्‍यांची अपुरी संख्या यामुळे कमालीची नाराजी पसरली आहे.