Tue, Jul 14, 2020 03:50होमपेज › Sangli › महापालिकेत भ्रष्ट मक्तेदारांना उमेदवारी नको

महापालिकेत भ्रष्ट मक्तेदारांना उमेदवारी नको

Published On: May 12 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 10:56PMसांगली : प्रतिनिधी 

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने गुंड आणि भ्रष्टाचारी तसेच वर्षांनुवर्षे महापालिकेत ठाण मांडून बसलेल्यांना  बिलकूल उमेदवारी देऊ नये अशी मागणी मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. तरीही  त्यांना  उमेदवारी  दिल्यास मी त्यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा युवा नेते विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

ते म्हणाले, काँग्रेसने नाकारलेल्या  प्रस्थापित आणि भ्रष्ट मक्तेदारांना भाजप उमेदवारी देणार का, ते आमदार सुधीर गाडगीळ यांनी  जाहीर करावे.पाटील म्हणाले, महापालिकेत वर्षांनुवर्षे अनेकांनी मक्तेदारी तयार केली आहे. काहींनी घराणेशाही जोपासली आहे. मात्र आता लोक त्यांना कंटाळले आहेत. या सगळ्यांनी एक टोळी बनवून महापालिकेची गेली अनेक वर्षे लूट केली आहे. नागरिकांना त्रास दिला आहे. ड्रेनेजसह अनेक योजना त्यांच्यामुळेच निष्फळ ठरल्या आहेत. गुंठेवारीतील नागरिक  सुविधांसाठी नागरिक टाहो फोडत असताना महापालिकेचे पैसे मात्र भलतीकडेच  गेले आहेत. ज्यांच्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत तीच मंडळी येन केन प्रकारे पुन्हा एकदा महापालिकेत येण्याची तयारी करीत आहेत. उमेदवारीसाठी सौदा  करीत आहेत.

ते म्हणाले, केवळ ‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्याच निकषावर काँग्रेसने पुन्हा त्या मक्तेदारांना उमेदवारी दिली तर लोक पक्षाला नेस्तनाबूत  केल्याशिवाय राहणार नाहीत.भले सत्ता नाही आली तरी बेहत्तर पण असल्यांना बरोबर घेऊ नये अशी लोकभावना आहे.   काँग्रेसला वातावरण चांगले आहे. मात्र नव्या, स्वच्छ चेहर्‍याच्या होतकरू कार्यकर्त्यांंना संधी देण्याची हीच वेळ आहे. ते धाडस आत्ताच दाखवले पाहिजे.  

पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रातील या   तीस-चाळीस प्रस्थापितांच्या दबावाला  काँग्रेसने बिलकूल भीक घालू नये. पक्षाचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मी त्याबद्दल स्पष्ट कल्पना दिली आहे. तसेच मिरजेत झालेल्या मेळाव्यात स्पष्टपणे बोललो आहे. या मूठभर निष्क्रीय प्रस्थापितांसाठी पक्षाकडे येणार्‍या नव्या दमाच्या हजारो कार्यकर्त्यांना बाजूला ठेवणे योग्य नाही.

ते म्हणाले, भाजपचे नेते साधनसुचितेचा उठता-बसता जप करीत असतात. काँग्रेसने नाकारलेल्या आयाराम- गयारामांना  उमेदवारी देणार का ते भाजपनेही जाहीर करावे. विशेषतः केवळ सत्ता मिळवण्यासाठी भाजपची तशी तयारी आहे, का ते आमदार गाडगीळ यांनी तरी सांगावे. निवडणूक जिंकायचे उद्दिष्ट ठेवून गुंड आणि गुन्हेगारांना सध्या क्लीन चिट देण्याचे  सत्तेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत ते निषेधार्ह आहेत. पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत   आमदार गाडगीळ यांना  राष्ट्रवादीने मदत केली होती हे उघड गुपित आहे. आता त्यांनीच ती युती संपली आहे, की अद्यापि शिल्लक आहे, ते सांगावे.