सांगली : प्रतिनिधी
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. भाजपच्या गोटात उमेदवारी कापाकापीचे; तर काँग्रेसच्या गोटात उमेदवारी झटकण्यावरून चांगलेच राजकारण रंगले. या सार्या घडामोडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अलिप्त दिसत आहेत. दोन्ही काँग्रेसचे हे ‘शेलारमामा’ अदृश्य झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतील राजकारण तरूण नेतृत्वाच्या हाती असल्याचे दिसत आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण सन 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचा हा बालेकिल्ला पुरता वाहून गेला. आता सन 2019 च्या निवडणुकीत सांगलीत भाजपविरोधात लढायचे कोणी यावरून काँग्रेसच्या दोन गटात शीतयुद्ध रंगले. आमदार विश्वजित कदम आणि युवा नेते विशाल पाटील यांनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत ‘कदम गट व दादा घराणे’ यांच्यातील गटबाजीवर शिक्कामोर्तब केले. काँग्रेसचे नेते (स्व.) डॉ. पतंगराव कदम, (स्व.) मदन पाटील, राष्ट्रवादीचे नेते (स्व.) आर. आर. आबा पाटील हे दोन्ही काँग्रेसचे नेते हयात असते तर आघाडीच्या उमेदवारीवरून इतके ‘महाभारत’ घडले नसते. भाजपविरोधात दोन्ही काँग्रेेसनी एकत्र येत सक्षम पर्याय दिला असता आणि निवडणुकीत चांगलाच रंग भरला असता, अशी चर्चा आता सुरू आहे. पण या सर्व ‘जर-तर’ ला सध्या महत्व नाही.
दोन युवा नेत्यांमध्ये उमेदवारीवरून कुरघोड्या सुरू असताना काँग्रेसचे बुजुर्ग नेते व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम हे सक्रिय दिसत नाहीत. त्यांची भूमिका अलिप्त दिसते आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे भाजपमध्ये आहेत. विलासराव शिंदे यांना आजारपणामुळे प्रकृती साथ देत नाही.
पण हातकणंगले मतदारसंघातील काही नेते शिंदे यांना भेटत आहेत. माजी खासदार निवेदिता माने यांच्या भेटीवरून राजकीय चर्चाही सुरू होती. सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींच्या मात्र त्यांच्याशी भेटी दिसत नाहीत. काँग्रेसची उमेदवारी जाहीर होत नसल्यावरून राष्ट्रवादीचे युवा नेते इशारा देत आहेत, पण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची भूमिका अलिप्त दिसत आहे. काँग्रेसअंतर्गत बाबींवर ते बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची अलिप्त भूमिका चर्चेची ठरली आहे.