Mon, Sep 16, 2019 05:30होमपेज › Sangli › करवसुलीत अतिरेकी त्रास देऊ नका

करवसुलीत अतिरेकी त्रास देऊ नका

Published On: Nov 17 2018 1:22AM | Last Updated: Nov 16 2018 8:44PMसांगली : प्रतिनिधी

वस्तू व सेवा करामुळे कर वसुलीत सुलभता आली आहे. मात्र करवसुली करताना अधिकार्‍यांनी करदात्यांना अतिरेकी त्रास न देण्याचे आवाहन   अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 
सांगलीत शुक्रवारी राज्यकर विभागाच्या ‘वस्तू व सेवा कर भवन’ या नूतन इमारतीचे ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील,  भाजप नेते मकरंद देशपांडे, वीज वितरणच्या संचालिका नीता केळकर, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर विभागाचे आयुक्त राजीव जलोटा, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, वस्तू व सेवा कर विभागाचे कोल्हापूर क्षेत्राचे अप्पर आयुक्त चंद्राहस कांबळे, विभागाच्या राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, सांगली विभागाचे विक्रीकर उपायुक्त योगेश कुलकर्णी, निरीक्षक राजेंद्र मेढेकर आदी प्रमुख उपस्थित होते. 

प्रारंभी मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते वस्तू व सेवा कर विभागाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी कोल्हापूर विभागातील आय. एस. ओ. मानांकन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 
ना.मुनगंटीवार म्हणाले, या नवीन भवनातून करदात्याला अधिकाधिक चांगली सेवा द्या. करांतून होणारी वसुली ही राज्याच्या अर्थसंकल्पासाठी मोलाची ठरते. यासाठी करदाते व्यापारी, उद्योजक यांच्याशी विनम्र वागणूक ठेवा. ते म्हणाले, जीएसटी लागू केल्यानंतरच्या काही कालावधीतच वसुलीत  देशातील अन्य राज्ये मागे पडत असताना महाराष्ट्राने मात्र आघाडी घेतली आहे. राज्यातील दीनदुबळ्या वंचितांना हे राज्य आपले वाटावे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी आर्थिक योगदान देणारा जीएसटी विभाग म्हणूनच मोलाची भूमिका बजावित आहे. वस्तू व सेवा करवसुलीत सांगली विभागाला सप्टेंबर 2018 अखेर 203 कोटींचे लक्ष्य असताना या विभागाने 228 कोटी 35 लाखाची वसुली करत आघाडी घेतली असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी सांगली विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे  कौतुक केले.  अधिकार्‍यांच्या वेतनवाढीचा प्रश्‍न मार्गी लावू , असेही ते म्हणाले.

खासदार संजय पाटील म्हणाले, वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्यामुळे व्यापारी वर्गाचे करवसुलीत त्रास वाचले आहेत. याचा विशेषत: बेदाणा व्यापार्‍यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.  राजीव जलोटा यांनी स्वागत केले. ते म्हणाले, कोल्हापूर विभागाने वसुलीत आघाडी राखली आहे. सप्टेंबर 2018 अखेरच्या वर्षांपर्यंत या विभागाला 1155 कोटींच्या वसुलीचे लक्ष्य होते. मात्र प्रत्यक्षात 1201 कोटींची वसुली झाली आहे. राज्याची देशात ‘बिझनेस फे्रंडली राज्य’ अशी ओळख होत झाली असतानाच वसुलीत देखील या विभागाने आघाडी राखली आहे.  यावेळी मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते कोल्हापूर विभागातील आय. एस. ओ. मानांकन प्रदान करण्यात आले. यावेळी सांगली, कोल्हापूर, सोलापूर विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विक्रीकर उपायुक्त योगेश कुलकर्णी यांनी आभार मानले.

चांगले काम करणार्‍यांनाच शिक्षा मिळते

ना. मुनगंटीवार म्हणाले, दोन वर्षांपूर्वी मंत्रालयातील आपल्या कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले. हे मानांकन मिळविणे तसे कठीण पण त्याहून त्यात सातत्य राखणे  अधिक कठीण याचे भान अधिकार्‍यांनी ठेवावे. चांगले काम करणार्‍यांना सातत्याने चांगले काम करण्याचीच शिक्षा मिळते, अशी मिश्किल टोलेबाजीही त्यांनी केली.