होमपेज › Sangli › दुसरी जागा दिली नाही तर आघाडीतून बाहेर पडू

दुसरी जागा दिली नाही तर आघाडीतून बाहेर पडू

Published On: Mar 26 2019 1:37AM | Last Updated: Mar 25 2019 11:50PM
सांगली : प्रतिनिधी 

काँग्रेसने पक्षांतर्गत वाद मिटवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्यातील बुलढाणा, शिर्डी अथवा सांगलीची जागा उद्या (मंगळवारी) सोडावी. अन्यथा संघटना आघाडीतून बाहेर पडून एकाकी लढत देईल, असा इशारा संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. वसंतदादा घराण्यावर अन्याय करण्याची आमची भूमिका नाही. विचका करून आम्हाला ही जागा नको आहे, असेही त्यांनी सांगितले.

सांगलीची जागा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी  स्वाभिमानीला देण्याचे कबूल केले आहे; पण काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला आहे.  यावरून  गेला  आठवडाभर काँग्रेस व स्वाभिमानीत वाद सुरू आहेत.   वसंतदादाप्रेमी गटाने रविवारी मेळावा घेऊन उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वाद खूपच चिघळला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी खासदार  शेट्टी यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे विषद केली. 

ते म्हणाले, आघाडीकडे आम्ही सहा जागांची मागणी केली होती. यामध्ये कोल्हापूर, सांगली, माढा, धुळे , हातकणंगले, बुलढाणा ,  वर्धा या  जागांचा समावेश होता.  परंतु हातकणंगले, बुलढाणा, वर्धा या तीन जागांचा आग्रह होता. बुलढाण्याला स्वाभिमानीची पहिली पसंती होती. जागा वाटपात आम्हाला आम्हीच निवडून येत असलेली हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिली. उरलेली एक जागा काँग्रेस देणार होती. काँग्रेसपुढे बुलढाणा, वर्धा असे पर्याय ठेवले होते. सांगलीचा आग्रह आम्ही धरला नव्हता. पण ऊस पट्टा व माझ्या जवळचा मतदारसंघ असल्याने तसेच काही प्रमाणात संघटनेची ताकद असल्याने आम्ही सांगली मिळाली तर हरकत नाही,  असे सांगितले.  

ते पुढे म्हणाले, परंतु गेल्या काही दिवसापासून स्वाभिमानीला सांगलीची जागा   हवी आहे. स्वाभिमानीकडून दादा घराण्यावर अन्याय केला जात आहे असा अपप्रचार सुरू आहे. आम्हाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे, हे दुर्दैवी आहे. संघटनेने कधीही दादा घराण्यावर अन्याय करण्याची भूमिका घेतलेली नाही आणि घेणारही नाही. वसंतदादा गट व स्वाभिमानीचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. वैचारिकदृष्ट्या दादागट संघटनेला आपला वाटतो. यावरुन आमच्यावर अनेकवेळा टीकाही झाली आहे. पण तरीही दादा घराणे व स्वाभिमानीच्या नात्यात कधीही अंतर आले नाही. त्यामुळे आमच्यावर केला जात असलेला आरोप चुकीचा आहे. दादा घराण्यावर आम्ही कधीच अन्याय करणार नाही. सांगलीची जागा घेण्याबाबत मला पहिल्यांदा विचारणा झाल्यानंतर मी ही बाब प्रतीक पाटील यांना सांगितली होती. तुम्हीच माझे उमेदवार असेही त्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी याला नकार दिला.

त्यांनी पुढे सांगितले की , सांगलीच्या जागेबाबत वादविवाद निर्माण झाल्यानंतर मी सतत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, दिल्लीतील ज्येष्ठ नेेते अहमद पटेल व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही संपर्क केला होता. विचका करुन आम्हाला ही जागा नको आहे. वादग्रस्त जागेत आम्हाला अजिबात रस नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. काँग्रेसने पक्षांतर्गत वाद व स्थानिक गटबाजी मिटवावी. सांगलीबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा. तो मंगळवार सायंकाळपर्यंत आम्हाला कळवावा. आम्ही दादा घराण्यासाठी सांगली सोडण्यास तयार आहे. सांगली शक्य नसेल तर संघटनेला शिर्डी अथवा बुलढाणा द्यावे. याला आम्ही तयार आहोत. उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास आम्ही आघाडीतून बाहेर पडू. 

विशाल यांना लोकसभेत; नव्हे विधानसभेत रस 

खासदार शेट्टी म्हणाले, विशाल पाटील यांनाही स्वाभिमानीमार्फत लढण्याची विनंती केली होती. पण त्यासाठी त्यांनी नकार दिला. विशाल यांनी ‘मी लोकसभेला नव्हे ;तर विधानसभेला इच्छुक आहे’ असे अनेकवेळा मला व काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी स्वाभिमानीकडून अथवा सर्वपक्षीय उमेदवार म्हणून लढावे. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू.