Tue, Sep 17, 2019 03:38होमपेज › Sangli › दुष्काळात हलगर्जीपणा केल्यास कारवाई

दुष्काळात हलगर्जीपणा केल्यास कारवाई

Published On: May 11 2019 2:05AM | Last Updated: May 10 2019 10:52PM
सागंली : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या बहुतेक भागात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी नियुक्तीच्या ठिकाणी थांबले पाहिजे. मागणी आल्यास लोकांना चारा-पाणी देण्याची गरज आहे. मात्र काही गावांत अधिकारी - कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर जागेवर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  दिला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीची आढावा बैठक ना. खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दादासाहेब सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, लोकांना पिण्याच्या पाण्याची तातडीने गरज असून टँकरला आणि चारा छावण्यांना चोवीस तासात मंजुरी देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले, दुष्काळासाठी शासन गंभीर असून उपाययोजनाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. टेंभू, ताकारी म्हैसाळ योजनेतून तलाव भरून घेण्यात येणार आहेत. तलाव भरल्यानंतर टँकर आणि पाणी योजना सुरू राहण्यासाठी मदत होणार आहे. टंचाई काळात जनावरांसाठी 40 लिटर पाण्याची मर्यादा आहे, त्यामध्ये वाढ करणे तसेच जनावरांसाठी अनुदान वाढवावे, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल. त्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 

आचारसंहिता शिथिल होताच पाणी योजनांसाठी खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेणार आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना स्वतः भेट देणार असून पाणी पुरवठा योजनांच्या कामांचाही आढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्यात 492 कामे सुरू असून 18 हजार 158 मजूर कामावर आहेत. पंचायत समिती स्तरावरील अधिकारी काम करत नाहीत, त्यामुळे कामे संथ गतीने सुरू असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केला. अधिकार्‍यांनी परिस्थितीचे भान ठेवून कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विंधन विहिरीचा आराखडा सोमवारपर्यंत करा

ना. खोत म्हणाले, जिल्ह्यातील अनेक विंधन विहिरी नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाणी असूनही लोकांना मिळत नाही. विंधन विहिरी दुरुस्तीचा आराखडा सोमवारपर्यंत सादर करावा. आराखड्याचे युद्धपातळीवर काम करावे, त्यामध्ये दिरंगाई करू नका, तसे झाल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल. अनेक पाणी योजना थकीत वीज बिलाअभावी बंद आहेत. मात्र टंचाई निधीतून पाच टक्के थकीत बिल भरले जाणार आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex