Tue, Sep 17, 2019 03:52होमपेज › Sangli › बॅकफूटवर गेलेला जिल्हा फ्रंटवर आणणार

बॅकफूटवर गेलेला जिल्हा फ्रंटवर आणणार

Published On: Apr 20 2019 1:54AM | Last Updated: Apr 19 2019 8:31PM
सांगली : प्रतिनिधी

भाजपचे उमेदवार संजय पाटील व स्वाभिमानी-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील हे दोन्ही उमेदवार एकाच खोट्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. दादागिरी आणि निष्क्रियता हे अवगुण हेच त्यांचे गुण आहेत. माझ्याविषयी संभ्रम निर्माण करणार्‍या विशाल पाटील यांचीच भाजपशी जवळीकता आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केली. 

प्रश्‍न :  तुमची उमेदवारी कशासाठी? 

पडळकर : खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्याकडे विकासाचा अजेंडाच नाही. खासदार पाटील यांनी पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान दिले? केवळ जिरवाजिरवीचे राजकारण केले. दहशत, दादागिरी करून विरोधकांना गप्प बसविणे हे त्यांचे राजकारण आहे. त्यांची दहशत कायमची मोडून काढायची आहे. लोकांना निष्क्रिय प्रस्थापितही नको आहेत. विकास आणि भयमुक्त जिल्हा यासाठी गावगाड्यातील सर्वच समाजघटकांनी माझी उमेदवारी हातात घेतली आहे. 

प्रश्‍न:  विशाल पाटील का नकोत? 

पडळकर : वसंतदादांचा नातू हे नाते सोडले तर विशाल पाटील यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. केंद्र, राज्यातील सत्ता गेल्याने गेली पाच वर्षे काँग्रेस विरोधात आहे. पण विशाल पाटील हे जनतेच्या प्रश्‍नांवर कधी रस्त्यावर उतरलेले पाहिले आहे का? दूध दरासाठी त्यांनी कधी आंदोलन केले का? सामान्य लोकांसाठी कधी राबले का? उसाचा दर आणि कामगारांची देणी न देणार्‍या आणि संस्था डबघाईला आणणार्‍या विशाल पाटील यांना मते मागण्याचा अधिकार तरी आहे का? (स्व.)मदन पाटील यांचा दोनवेळा पराभव झाला. त्याला कारणीभूत कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. विशाल पाटील यांना जत, आटपाडी, खानापूर तालुक्यातील गावांची नावे तरी माहिती आहेत का? लोकांमध्ये गेले असते तर आजची दारूण स्थिती  त्यांच्यावर ओढवलीच नसती.  

प्रश्‍न : तुम्ही भाजपवर टीका करीत नाही?

पडळकर : संजय पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यावरील टीका ही भाजपवरील टीका आहे. ती मी सतत करीत आहे. व्यक्तीद्वेषातून टीका करत नाही. भाजपने चुकीच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. भाजप ही भ्रष्टाचारी पार्टी आहे. भाजपचा जनाधार घटला आहे. पैसे सोडून भाजपकडे आता काहीच उरले नाही. विशाल पाटील हे माझ्याविषयी संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र त्यांचीच भाजपशी जवळीक आहे. भाजपने विशाल पाटील यांना ऑफर दिली होती. भाजपने प्रतीक पाटील यांनाही प्रदूषण नियंत्रण महामंडळाची ऑफर दिली होती. त्यामुळे भाजपशी कोणाची जवळीक आहे हे दिसून येते. विशाल पाटील यांनी मुस्लिम समाजासाठी काय केले? संभ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याचे दिवस केव्हाच संपले आहेत. 

प्रश्‍न: जातीयवादाची टीका होते?

पडळकर : मी जातीयवादी असतो तर गावगाड्यातील मराठा समाजासह सर्व समाजघटकांतील तरूण माझ्यासाठी झटले असते का? परवा सावळजला प्रचंड सभा झाली. काल मणेराजुरीतही सभेला प्रचंड गर्दी होती. ही गावे धनगर समाजाची आहेत काय? मराठा समाज संख्येने अधिक असणार्‍या अनेक गावांमधून मला मोठी साथ मिळते आहे. त्यामुळेच विरोधक माझ्यावर जातीयतेचा आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रश्‍न : जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा काय? 

पडळकर : लोकसभा निवडणुकीत मी निश्‍चित विजयी होणार आहे. निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न प्राधान्याने सोडविणार आहे. केंद्र शासनाच्या अनेक विकासाच्या योजना असतात, पण त्या राबविण्याबाबत आजपर्यंतचा अनुभव वाईट राहिला आहे. निवडून आल्यानंतर केंद्राच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. जिल्ह्यात मोठे उद्योग आणून बेरोजगारी कमी केली जाईल. लहान-मोठे उद्योग, व्यवसाय करू इच्छिणार्‍या युवकांना बँकांकडून पतपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. शेतीपूरक उद्योग सुरू करून शेतीमालाला रास्त भाव मिळवून दिला जाईल. शेतकर्‍यांचे परदेश दौरे आयोजित करून शेतीत तंत्रज्ञान व आधुनिकतेचा वापर घडवून आणला जाईल. बॅकफुटवर गेलेला सांगली जिल्हा विकासात फ्रंटवर आणण्यासाठी अहोरात्र झटेन. मतदारांनी मला एकवेळ संधी देऊन पहावे. जिल्ह्यात खर्‍या अर्थाने विकासाची पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex