Fri, Dec 13, 2019 06:08



होमपेज › Sangli › सांगलीत पत्नीकडून पतीचा निर्घृण खून

सांगलीत पत्नीकडून पतीचा निर्घृण खून

Published On: Apr 22 2019 1:35AM | Last Updated: Apr 22 2019 1:35AM




सांगली : प्रतिनिधी

शहरातील शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीत कौटुंबिक वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात पहारीने वार करून निर्घृण खून केला. चंद्रकांत धोंडिराम साळुंखे (वय 47) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोन तासांतच शहर पोलिसांनी संशयित पत्नीला ताब्यात घेतले आहे. माधवी चंद्रकांत साळुंखे (वय 37) असे तिचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

चंद्रकांत साळुंखे पत्नी माधवी, मुलासमवेत शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीत ते रहात होते. त्यांचा गणपती पेठेत चहाचा गाडा आहे. रविवारी सकाळपासूनच पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणासह कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते. त्यात चंद्रकांतने दारू पिऊन शिवीगाळ केल्याने त्यांच्या पत्नीने रविवारी सकाळीच शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी चंद्रकांत नेहमीच दारू पिऊन त्रास देतो असेही तक्रारीत म्हटले होते. 

त्यानंतर चंद्रकांतविरोधात अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोघेही पती-पत्नी घरी निघून गेले होते. घरी गेल्यानंतरही त्यांच्यात वाद सुरूच होता. 

रात्री पुन्हा चंद्रकांतने दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो नेहमीच दारू पिऊन त्रास देत होता. रविवारी दिवसभर पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो पुन्हा दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याने माधवी यांचा राग अनावर झाला. 

रात्री सातच्या सुमारास माधवीने रागाच्या भरात घरातील पहार घेऊन त्याच्या डोक्यात घातली. तो घाव त्याच्या वर्मी बसला. त्यामुळे तो घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर माधवीने याची माहिती चंद्रकांतच्या भावाला दिली. भाऊ तेथे आल्यानंतर त्याने चंद्रकांतला जखमी अवस्थेत सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रात्री उशीरा उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत रात्री उशीरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.