होमपेज › Sangli › सांगली : पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू

सांगली : पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू

Published On: Jun 26 2019 8:00PM | Last Updated: Jun 26 2019 8:01PM
सांगली :  प्रतिनिधी 

सोन्याळ (ता. जत) येथे सोमणा तमणा पुजारी (वय ५०) यांचा पत्नीच्या मारहाणीत संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी घडली. सोमणा पुजारी हा दररोज दारु पिऊन घरी येवून पत्नीशी भांडत होता. आज सकाळी १० च्या सुमारास दारु पिऊन घरी आला असता पत्नी नागवा सोमणा पुजारी यांच्या दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. वादावादी सुरु असताना पत्नी नागवा हिने शेजारी असलेली काठी घेवून पती सोमणा यास मारले व ती तेथून शेजारील आपल्याच भावकीतील घरी निघून गेली.

थोड्या वेळानी परत येवून पाहिल्यानंतर पती सोमणा आहे त्या ठिकाणीच पडून होता. नंतर आरडा ओरडा केल्यानंतर जवळपास असणारे लोक त्या ठिकाणी आले असता सोमणा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. याबाबत नागरिकांनी उमदी पोलिसांना कळविले.

उमदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक नामदेव दाडंगे, पोलिस अर्जुन सगर, श्रीशैल वळसंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सोमणा याच्या मृतदेहाची पहाणी करुन मृतदेह जत येथे पाठवण्यात आला. संशयित म्हणून उमदी पोलिसांनी पत्नी नागवा सोमणा पुजारी हिला ताब्यात घेतले असून अधिक तपास उमदी पोलिस करत आहेत.