Wed, Jun 19, 2019 08:59होमपेज › Sangli › ‘हातकणंगले’त रंगणार शेतकरी नेत्यांत सामना?

‘हातकणंगले’त रंगणार शेतकरी नेत्यांत सामना?

Published On: Oct 12 2018 1:02AM | Last Updated: Oct 11 2018 8:46PMइस्लामपूर : मारूती पाटील

आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भाजपकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने ना. खोत यांनीही मतदारसंघात सातत्याने संपर्क वाढविला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शेतकरी चळवळीतील हे दोन नेते व एकेकाळचे जीवलग मित्र भाजप - राष्ट्रवादीच्या बळावर एकमेकांविरोधात मैदानात उतरतील अशी चिन्हे दिसत आहेत. 

भाजप आघाडीशी फारकत घेतल्यानंतर खासदार शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधली आहे. राज्यात भाजपविरोधात समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानीला तसे निमंत्रणही दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. खासदार शेट्टी या आघाडीत सामील झाल्यास त्यांच्यासाठी हातकणंगले मतदारसंघ सोडला जाऊ शकतो. मात्र शेट्टी यांना पाठिंबा देण्यास राष्ट्रवादीतूनच काहींचा विरोध असल्याचे समजते. हा विरोध चर्चेतून सुटेल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीत ना. खोत यांना मैदानात उतरवले जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ना. खोत यांनीही वेळोवेळी भाजपने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. 

उमेदवारीची माळ गळ्यात पडणार हे गृहित धरुन त्यांनी गेल्या काही महिन्यापासून हातकणंगले मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधीही त्यांनी मंजूर केला आहे. ना. खोत यांना भाजपची उमेदवारी मिळाली व खासदार शेट्टी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीतून मैदानात उतरले तर या दोन शेतकर्‍यांच्या नेत्यात चांगलाच सामना रंगणार आहे.