Tue, Jul 14, 2020 02:28होमपेज › Sangli › टँकर लॉबी मोडण्यात प्रशासनाला यश

टँकर लॉबी मोडण्यात प्रशासनाला यश

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 11:03PMसांगली : शशिकांत शिंदे

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून असलेली टँकर लॉबी मोडीत काढण्यात  प्रशासनास यश आले आहे. यंदा पिण्याच्या पाण्यासाठी काही दिवस केवळ तीनच टँकर होते. तुलनेत गेल्या वर्षी 168 गावांत 172 टँकरवर 11 कोटी 40 लाख रुपये खर्च झाले होते. प्रशासनाने केलेले नियोजन, जलयुक्त शिवारची कामे, म्हैसाळ, टेंभू, ताकारी, आरफळ या पाणी योजना आदींमुळे हा बदल झालेला पाहण्यास मिळत आहे.
जिल्ह्याचा पूर्व भाग हा पूर्वीपासून दुष्काळी म्हणून ओळखला जातो. काही गावात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असते. वीस एक वर्षापूर्वीपर्यंत अन्न-धान्य आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण होत होता. मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न फारसा गंभीर झाला नाही. मात्र गेल्या काही वर्षात बोअरच्या सहाय्याने कूपनलिका मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू झाल्यानंतर जमिनीतील पाणीपातळी झपाट्याने खालावली.  

बागायती क्षेत्र वाढवण्यासाठी काही बागायतदार शेतकर्‍यांत स्पर्धा सुरू झाली. त्यातून अन्न-धान्याचा नाही, मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनू लागला. त्यातच टँकरच्या सहाय्याने पिण्याचे पाणी देण्याची कल्पना पुढे आली. त्याशिवाय नळपाणी पुरवठा योजना सुरू होऊन गावागावात नळ आले. परिणामी गावातील वर्षानुवर्षे असलेले पाणवठे संपुष्टात आले.  एका बाजूला गावात हिरवेगार बागायती क्षेत्र दुसर्‍या बाजूला पिण्यासाठी पाण्याचे टँकर असा विरोधाभास तयार झाला. गावातील प्रत्यक्षात दिलेल्या टँकरपेक्षा कागदावरील टँकरची संख्या वाढू लागली.  प्रशासनातील काही अधिकार्‍यांनी अनेकवेळा विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकीय नेत्यांच्या दबाव आणि भ्रष्ट कारभार यामुळे त्याला यश आले नाही.  त्यामुळे जिल्ह्यात टँकर लॉबी तयार झाली. 

दुसर्‍या बाजूला चारा छावणीत कोट्यवधीचा घोटाळा होऊ लागला. त्यातूनच दोन वर्षापूर्वी कोट्यवधी रुपयांचा चारा घोटाळा चव्हाट्यावर आला. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या संबंधित संस्थाचालकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन वर्षापूर्वी छावण्या बंद झाल्या तरी टँकर मात्र सुरूच राहिले. गेल्या वर्षी जिल्ह्यातील 162 गावांत दोन महिने 172 टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. त्यासाठी तब्बल 11 कोटी 40 लाख रुपये खर्च झाले. 

सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून विजयकुमार काळम - पाटील यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी ही टँकर लॉबी मोडीत काढण्यासाठी  लक्ष घातले. उन्हाळा सुरू होण्या अगोदरच पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले. बंद असलेल्या नळपाणी पुरवठा योजना सुरू केल्या. पाणी योजनांच्या माध्यमातून पाझर तलाव भरून घेतले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात  4  हजार 605 शेततळी तयार केली. त्यातून  5 हजार 705 टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. 2  हजार 852 हेक्टर संरक्षित सिंचनक्षेत्र निर्माण झाले. या  योजनेसाठी सुमारे  19 कोटी 29  लाख  अनुदान मिळवले. त्यामुळे बहुतेक गावात पिण्याचा पाण्याचा फारसा प्रश्‍न निर्माण झाला नाही. आवश्यकता निर्माण झाल्याशिवाय टँकर देणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकार्‍यांनी घेतली. तरीसुध्दा काही गावातील पुढार्‍यांच्या सांगण्यानुसार नेत्यांनी टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मागणी झाली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी समिती नियुक्ती केली. या समितीने पाहणी करून गरज असेल तरच टँकर देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे टँकर लॉबी मोडीत निघाली. यावर्षी खानापूर तालुक्यात तीन गावांत अत्यल्प काळासाठीच टँकर सुरू होते.  

टँकर लॉबीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पुरवणार्‍या लॉबीत  सर्वच राजकीय पक्षातील कार्याकर्त्यांचा सहभाग होता. त्यामुळे या गोलमालात सर्वच नेत्यांनी मौन धारण केले होते. प्रशासनातील काही फितूरांच्या चिरीमिरीतील मदतीने वर्षेन् वर्षे सरकारची लूट सुरू होती. प्रशासनाच्या बडग्यामुळे ती आता मोडीत निघाली.  

सामूहिक प्रयत्नामुळे टँकर थांबले : जिल्हाधिकारी

बंद असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे केली. पाझर तलाव भरून घेतले. जिल्ह्यात आवश्यकता असेल तरच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर देण्याची भूमिका सुरूवातीपासून घेतली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न फारसा गंभीर झाला नाही. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे हे शक्य झाले.