होमपेज › Sangli › लाच म्हणून मागितली सोन्याची अंगठी; पोलिसावर गुन्हा दाखल

लाच म्हणून मागितली सोन्याची अंगठी; पोलिसावर गुन्हा दाखल

Published On: Dec 22 2018 1:42AM | Last Updated: Dec 21 2018 11:51PM
सांगली : प्रतिनिधी

कार विक्रीच्या व्यवहारात चोरी केल्याप्रकरणी गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून त्यातून वाचवण्यासाठी लाचेपोटी सोन्याच्या अंगठीची मागणी करणार्‍या पोलिस हेड कॉन्स्टेबलविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत गोरखनाथ सावंत असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत आहे. कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली. दरम्यान सावंत पसार झाल्याचे सांगण्यात आले. 

यातील तक्रारदार उत्तरप्रदेश येथे गलाई व्यवसाय करतात. त्यांचे मूळ गाव वायफळे (ता. तासगाव) आहे. पूर्वी ते पुण्यात जिम ट्रेनर म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी मध्यस्थी करून मित्रासाठी एक कार विकत घेतली. त्यानंतर त्यांच्या मित्राने ती कार दुसर्‍याला विकली. दरम्यान पूर्वीच्या कार मालकाने पूर्ण पैसे न मिळाल्याने गाडी नावावर करून दिली नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी सावंत तक्रारदाराच्या सांगलीतील घरी गेले. तेथे त्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊन संपर्क साधण्यास सांगितले.  त्यानंतर तक्रारदारांनी सावंत यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कारबाबत विचारणा केली. नंतर चौकशीसाठी भेटायला या असे सांगितले. त्यानंतर त्यांनी सावंत यांची भेट घेतल्यावर तुम्हाला या प्रकरणातून सोडवतो त्यासाठी सोन्याची अंगठी द्या अशी मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी याबाबत 23 ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सावंत यांच्याविरोधात तक्रार केली. विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सावंत यांनी सोन्याच्या स्वरूपात लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी सावंत यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सावंत पसार झाल्याचे सांगण्यात आले. 

अंगठी ठेवायला सांगितली पण...

दरम्यान सूर्यकांत सावंत यांना अंगठी घेताना रंगेहात पकडण्यासाठी विजयनगर येथे 1 ऑक्टोबर रोजी सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी तक्रारदाराने सावंत यांना फोन केल्यानंतर सावंत यांनी विजयनगर येथील एका कॉम्प्लेक्स समोरील मोटारसायकलवरील हेडलाईटच्या काचेच्या मागे ठेवण्यास सांगितले. पण नेमकी कोणती मोटारसायकल ते सांगितले नाही. त्यामुळे तक्रारदार अंगठी न ठेवताच निघून गेले. त्यामुळेच शुक्रवारी सावंत यांच्याविरोधात लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.