Mon, Sep 16, 2019 11:47होमपेज › Sangli › सांगलीत आजपासून तडकडताईची फेरी

सांगलीत आजपासून तडकडताईची फेरी

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 9:41PMसांगली : गणेश कांबळे

सांगलीचा जोगण्या उत्सव ‘तडकडताई’ च्या रुपाने गुरुवारपासून सुरू होत आहे. सुमारे 200 वर्षांपासून ही प्रथा सांगलीमध्ये सुरू आहे. सांगलीतील पार्वती पांडुरंग कुंभार यांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे. 
आषाढात  पाऊस  सुरू असतो.  या पार्श्‍वभूमीवर येथे तडकडताई बाहेर पडते. बारा बलुतेदारांचा या उत्सवात सहभाग असतो. गावभागातील कुंभारखिंडीपासून या उत्सवाला सुरुवात होते. अनेक वर्षांपासून या प्रथेची जपणूक करणार्‍या पार्वती कुंभार यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले,  सुमारे दोनशे वषार्ंपूर्वी आमच्या पूर्वजांनी कर्नाटकातील  बदामी येथील बनशंकरी येथून सात वाट्या (मुखवटे) पळवून आणले. त्यामुळे  सांगली, आष्टा, कवठेसार, कवठेपिरान, उदगाव, वाटेगाव आणि पलूस या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. अमावस्येदिवशी सकाळी श्री संगमेश्‍वर मंदिराजवळ जाऊन कणकेचा दिवा शोधला जातो. त्या ठिकाणी पावसाची भाकणूक केली जाते. त्यानंतर सायंकाळी जोगण्यांचे लग्न लावले जाते. सिध्दार्थनगरमध्ये वेताळाचे देऊळ आहे. त्या ठिकाणी पुन्हा लग्न लावण्यात येते. 

दैत्याचा नाश करण्यासाठी देवी तडकडताईचा वेश धारण करून भागातून फेरी मारू लागते, अशी कथा आहे. ती ज्या भागात जाईल, त्या ठिकाणी सुख-समृद्धी येते, अशी लोकांची श्रद्धा आहे. विशेषतः मुले तिचे प्रचंड उत्साहात स्वागत करतात.मुले ‘तडकडताई भुताची आई’, असे ओरडत तिच्या मागेपुढे पळत  असतात. तडकडताईच्या हातात सूप असते. त्या सुपाचा फटका देण्यासाठी ती धावत जाते. त्यामुळे मुले भन्नाट पळत सुटतात. तिच्या हातातील सुपाचा मार शुभदायक मानला जातोगावभागापासून सुरू झालेला  तडकडताईचा फेरा 15 दिवस  सुरू असतो.  हा फेरा सुरू असतो त्यावेळी धमाल वातावरण असते. ‘आली...आली तडकडताई आली...’, असा आरडाओरडा करीत मुले पुढे-मागे पळत असतात.  शाळा भरण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर मुलांची प्रचंड गर्दी झालेली असते. पार्वती कुंभार म्हणाल्या, संस्थान काळात उत्सवासाठी हत्ती, घोडे, तलवारी, वाजंत्री असा लवाजमा मिळत होता. तो आता बंद झाला आहे. आमच्यानंतर आता मुलांनी ही प्रथा सुरू ठेवावी, अशी इच्छा आहे. मुले, नातू यांनीही ते कबूल केले आहे. 

सर्वांच्या सुखाचा विचार करणारे  कुंभार अडचणीत

पार्वती कुंभार म्हणाल्या, सर्वांना सुखसमृध्दी येऊ दे म्हणून आम्ही ही प्रथा टिकवून ठेवली आहे. मात्र, आता आमचा समाजच अडचणीत आला आहे. पूर्वी आमचा गणपती मंदिरासमोर व्यवसाय होता. परंतु आम्हाला मंदिराच्या पाठीमागे जागा देण्यात आली. पण ती आमच्या मालकीची नाही. तिथे ग्रामीण भागातील ग्राहक मातीच्या वस्तू खरेदीसाठी फारसे येत नाहीत. त्यामुळे आमचा व्यवसाय अडचणीत आला आहे.  कुंभार समाजाला व्यवसायासाठी मदतीची गरज आहे.