होमपेज › Sangli › साखर उचलण्यावरून ‘सर्वोदय’वर तणाव

साखर उचलण्यावरून ‘सर्वोदय’वर तणाव

Published On: May 08 2019 1:58AM | Last Updated: May 07 2019 11:34PM
आष्टा : प्रतिनिधी

राजारामबापू साखर कारखान्याने सर्वोदय कारखान्यामधील साखर उचलण्याच्या हालचाली मंगळवारी सुरू केल्या. त्यामुळे सकाळपासून दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते  कारंदवाडीत जमा झाले. वातावरण तणावपूर्ण बनले असून यापुढच्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या मालकी हक्‍कावरून निर्माण झालेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती आदेश दिला आहे. शासनाने सर्वोदय व राजारामबापू पाटील या दोन कारखान्यांमध्ये झालेला भागीदारी व सशर्त विक्री करार दि. 25 जानेवारी रोजी रद्द केला. त्यानंतर राजारामबापू कारखाना प्रशासनाने शासनाच्या या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे आदेशाला स्थगिती देण्यात आली.

दरम्यान, दि.24 फेब्रुवारी रोजी सर्वोदय कारखान्याचे संस्थापक  संभाजी पवार गटाचे काही संचालक व कार्यकर्त्यांनी कारंदवाडी येथील सर्वोदय पेट्रोल पंपाचा ताबा घेतला.त्यावेळीही दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

दोन्ही गटांकडून आष्टा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी दोन्ही गटांना शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतची नोटीस दिली होती. सध्या सर्वोदय कारखान्यात सर्वोदय व राजारामबापू कारखान्याचे प्रशासन  आहे.

‘सर्वोदय’चा गळीत हंगाम संपल्यानंतर राजारामबापू प्रशासनाकडून साखर कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती व देखभालीसाठी खोलण्यात आल्या होत्या. यावर गैरसमजातून ‘सर्वोदय’च्या पवार गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती आदेश असताना मशिनरी काढून नेण्यात येत असल्याची तक्रार 25 एप्रिल रोजी दाखल करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने परत एकवेळ (26 एप्रिल) रोजी अंतिम आदेश होईपर्यंत दोन्ही गटांना ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.

दरम्यान या गळीत हंगामात सर्वोदयमध्ये तयार झालेली साखर  रविवारी रात्री बाहेर काढत असताना सर्वोदय प्रशासनाने त्याला विरोध केला .त्यामुळे मंगळवारी ( दि.7 ) रोजी सकाळी राजारामबापू युनिट 1 व 2 च्या सुमारे 400 कामगारांसह अध्यक्ष पी.आर.पाटील, सर्व संचालक ,पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वोदयवर जमा झाले. ही माहिती मिळताच संभाजी पवार ,गौतम पवार , संचालक व सुमारे दोनशे कार्यकर्ते सर्वोदय पेट्रोल पंपावर जमा झाले.दोन्ही गटांचे कार्यकर्ते दिवसभर साखर कारखाना व पेट्रोल पंपावर बसून होते.

राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी सांगितले की , मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोदयचे विस्तारीकरण , मशिनरी व अन्य मालमत्ता हस्तांतराला स्थगिती दिली आहे.सर्वोदयमध्ये तयार झालेली साखर , बगॅस व मळी हस्तांतरणाला स्थगिती आदेश दिलेला नाही.साखरेची विक्री केल्याशिवाय शेतकर्‍यांना शासनाने ठरवून दिलेली आधारभूत किंमत (एफआरपी) देता येणार नाही.बिलाला उशीर होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे.

ते म्हणाले,विक्रीसाठी साखर बाहेर काढत असताना  पवार गटाकडून   विनाकारण विरोध केला जात आहे.या कारणावरून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी इस्लामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे व आष्टा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सर्वोदयच्या कार्यकर्त्यांंनी सांगितले की , मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम आदेश होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.त्यामुळे सर्वोदयमधील कोणतीही मालमत्ता कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही.आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आहोत.