Mon, Dec 16, 2019 08:41होमपेज › Sangli › चार अट्टल चोरट्यांना अटक

चार अट्टल चोरट्यांना अटक

Published On: Mar 06 2019 1:01AM | Last Updated: Mar 06 2019 1:01AM
सांगली : प्रतिनिधी

शहरातील विश्रामबाग आणि संजयनगर येथील चार दुकाने एका रात्रीत फोडणार्‍या चार अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी रात्री ही कारवाई केली. त्यांच्याकडून तीन मोटारसायकल, दोन मोबाईल, रोख रक्कम असा एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुरेश परसाप्पा छलवादी (20, दडगे हायस्कूल रस्ता, सांगली), सूरज ऊर्फ अण्णा नितीन जाधव (20, समृद्धी कॉलनी, सांगली), लखन भीमराव एरंडकर (20) आणि शंकर ऊर्फ सोन्या पिराजी पवार (19, दोघेही रा. हिंगोली)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

रविवारी मध्यरात्री विश्रामबाग, संजयनगर येथील चार दुकाने फोडण्यात आली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी  या चोरट्यांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे एक पथक सोमवारी रात्री सांगलीत गस्त घालत होते. 

त्यावेळी त्या चोरीतील संशयित सुरेश छलवादी कॉलेज कॉर्नर परिसरात थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने अन्य तीन साथीदारांच्या मदतीने विश्रामबाग पोलिस वसाहतीसमोरील डायमंड बिअर शॉपी, शिंदे मळ्यात रेल्वे पुलाखालील राजू गोसावी यांचे रिस्पार बियर अ‍ॅण्ड वाईन शॉप, रेल्वे स्थानकाजवळ किरण अमृत शहा यांचे संतोष किराणा स्टोअर्स, मार्केट यार्डात संदीप शंकर राऊत यांचे इंडिया वॉईन शॉप फोडल्याची कबुली दिली. 

त्यानंतर त्याचे साथीदार सूरज जाधव, लखन एरंडकर, शंकर पवार यांना कबनूर (ता. हातकणंगले) येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी या चार दुकानांसह मीरा हाऊसिंग सोसायटीतील दोन मोटारसायकल तसेच वसमत (जि. हिंगोली) येथे एक मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन मोटारसायकल, दोन मोबाईल, रोख रक्कम असा एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांनाही संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, निलेश कदम, बिरोबा नरळे, अरूण सोकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

तिघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार...

संशयित सूरज जाधव याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात खून, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच परभणीत घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचेही 8 गुन्हे दाखल आहेत. सुरेश छलवादी याच्यावर शहर पोलिस ठाण्यात घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच लखन एरंडकर याच्यावरही घरफोडीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.