Tue, Jul 14, 2020 02:07होमपेज › Sangli › सांगली जिल्ह्यातील चार दारू दुकानांचे परवाने निलंबित

सांगली जिल्ह्यातील चार दारू दुकानांचे परवाने निलंबित

Published On: Oct 06 2019 1:34AM | Last Updated: Oct 06 2019 12:12AM
सांगली : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू असताना वेळेचे बंधन न पाळता रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी जिल्ह्यातील चार दारू दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये तीन परमिट रूम व एका वाईन शॉपचा समावेश आहे. 

बेकायदा दारूसाठा तसेच विक्रीचे जिल्ह्यात आतापर्यंत 65 गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यातील 68 संशयितांना अटक करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत गुन्हे दाखल होण्याचा हा आकडा आणखी वाढू शकतो. आचारसंहिता काळात हॉटेल, परमिट रूम बियर बार, देशी दारूची दुकाने, बियर शॉपी व वाईन शॉपी रात्री साडेदहा वाजता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. या आदेशाचे अजूनही पालन केले जात नसल्याचे राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईवरून दिसून येते. उशिरापर्यंत दारूची सर्वच प्रकारची दुकाने सुरू ठेवणार्‍या व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकाकडून  संपूर्ण जिल्ह्यात रात्री साडेआठनंतर गस्त सुरू होते. 

पथकाने आतापर्यंत बेकायदा दारूसाठा व विक्रीच्या 68 अडड्यांवर छापे टाकले. 22 लाख 87 हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. यामध्ये सांगलीतच सर्वाधिक 18 लाख रुपयांची दारू जप्त करण्याची मोठी कारवाई झाली आहे. 68 संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याविरूद्ध न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी तीन परमिट रूम व एका शॉपच्या मालकांविरूद्ध विभागीय गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या व्यवसायाचा परवाना तात्पूरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आला आहे. ही कारवाई आणखी तीव्र केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.