Fri, Jul 10, 2020 01:42होमपेज › Sangli › मिरजेत चार नगरसेवकांचे उपोषण 

मिरजेत चार नगरसेवकांचे उपोषण 

Published On: Jun 19 2019 1:36AM | Last Updated: Jun 18 2019 10:20PM
मिरज : शहर प्रतिनिधी 

सत्ताधारी भाजपच्या महापालिका पदाधिकारी व अधिकार्‍यांकडून प्रभाग क्रमांक सहामध्ये दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी येथील महाराणा प्रताप चौकात मंगळवारी उपोषण सुरू केले आहे.

मिरजेतील नगरसेवक मैनुद्दीन बागवान, नरगीस सय्यद, अतहर नायकवडी, रजिया काजी हे प्रभाग क्रमांक सहामधून निवडून आले आहेत. या प्रभागात पदाधिकारी व अधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, असा आरोप करीत या नगरसेवकांनी महापौर संगीता खोत व तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. या प्रभागातील अशुद्ध पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या नगरसेवकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आज या चारही नगरसेवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नगरसेवक बागवान म्हणाले, मी गेले पंचवीस वर्षे मिरजेत नगरसेवक आहे. मात्र प्रभागाच्या विकासाबाबत कुणीही अद्याप अन्याय केला नव्हता. मात्र आता अन्याय केला जात आहे. शासनाने पूर्वी वीस कोटी व आता शंभर कोटी रुपये मिरजेला दिले आहेत. मात्र या प्रभागांमध्ये एकही काम त्यातून मंजूर झाले नाही. हा प्रभागातील नागरिकांवर अन्याय आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल.