Fri, Sep 20, 2019 21:35



होमपेज › Sangli › जत तालुक्यात पाच चारा छावण्यांना मंजुरी 

जत तालुक्यात पाच चारा छावण्यांना मंजुरी 

Published On: May 12 2019 2:07AM | Last Updated: May 11 2019 11:39PM




 जत : शहर प्रतिनिधी 

जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी प्रशासन सतर्क आहे. पशुधनाकरिता चारा छावणीचे अर्ज शासनाने मागितले होते. आलेल्या सर्व चारा छावण्याचे अर्ज छाननी करुन वरिष्ठ कार्यालयाला पाठवून दिले होते. त्यातील पाच चारा छावण्यांना  जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

तहसीलदार सचिन पाटील म्हणाले, तालुक्यातील लोहगाव येथील मारुतीराव पाटील सार्वजनिक वाचनालय लोहगाव या संस्थेस 8 मे रोजी  चारा छावणी सुरू करण्याबाबत मान्यता मिळाली आहे. तसेच सौ. द्वारकाई  नाना बहुउद्देशीय सेवा संस्था बेवनूर, दरीबडची येथे ज्योतिर्लिंग सहकारी दूध उत्पादक संस्था दरीबडची, सालेकिरी- पाच्छापूर येथील बुवानंद दूध व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित पाच्छापूर, बालगाव येथे व्हनाप्पा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट बालगाव या 5 ठिकाणी चारा छावण्या सुरू करणयास जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळालेली आहे. सदरच्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.  मंजूर  चारा छावण्यांपैकी तीन चारा छावण्या जतच्या पूर्वभागात असून दोन चारा छावण्या पश्चिम भागात आहेत. तसेच उर्वरित आलेल्या अर्जांची छाननी करून देखील माहिती वरिष्ठ कार्यालयास पाठवून दिलेली आहे .

जत तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.  पशुधन संकटात आले असताना  एकही चारा छावणी चालू झालेली नव्हती. याबाबत दैनिक पुढारीमध्ये दुष्काळग्रस्त झाले त्रस्त, अधिकारी कागदी  घोडे नाचविण्यात व्यस्त, प्रशासनाची बघ्याची भूमिका या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. जत तालुक्याच्या शेजारच्या  सांगोला तालुक्यातील  हाकेच्या अंतरावर  गावागावात चारा छावण्या सुरू झाल्याचा संदर्भ फोटोसह देण्यात आलेला होता.