Wed, Jul 08, 2020 00:17होमपेज › Sangli › पहिले ‘एव्हरेस्ट’वीर ‘आयपीएस’ सुहेल शर्मा

पहिले ‘एव्हरेस्ट’वीर ‘आयपीएस’ सुहेल शर्मा

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 10:41PMसांगली : अभिजित बसुगडे

सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केवळ वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसर्‍याच प्रयत्नात एव्हरेस्ट सर केले. त्यांच्या या यशस्वी चढाईला दि. 20 मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. एव्हरेस्ट सर करणारे ते देशातील पहिले आयपीएस अधिकारी ठरले आहेत. पंजाबमधील अमृतसर हे त्यांचे गाव. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हिमालयीन माऊंटेरियन इन्स्टिट्यूटमध्ये गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले.  त्यांच्या वडिलांनी सुहेलने एव्हरेस्ट सर करावे असे स्वप्न पाहिले होते. जानेवारी 2015 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात शर्मा एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेवर गेले. 

फेब्रुवारी 2015 मध्ये त्यांनी  मित्रांच्या ग्रुपसोबत एव्हरेस्ट चढाईला प्रारंभ केला. दि.25 एप्रिल 2015 रोजी ते 18 हजार फूट उंचीवर पोहोचले. मात्र त्याचदिवशी नेपाळ परिसरात 7.8 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला. त्यामध्ये शर्मा यांच्यासह त्यांचा सर्व ग्रुप बर्फाखाली गाडला गेला. यामध्ये त्यांच्या 18 मित्रांचा मृत्यू झाला, तर 60 जण जखमी झाले. त्यावेळी शर्मा चार ते पाच दिवस बर्फाखाली दबले गेले होते. त्या दुर्घटनेत त्यांच्या शरिराच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती.

या संकटामुळे त्यांना परत यावे लागले. मात्र  एव्हरेस्टची 29 हजार 29 फूट उंची त्यांना आव्हान देत होती. नेपाळ, तिबेटच्या सीमेवर एव्हरेस्ट शिखर आहे. त्यावर  चीनच्या बाजूने टढाई सर्वात कठीण मानली जाते. हे आव्हान स्विकारत एप्रिल 2016 मध्ये त्यांनी चीनच्या बाजूने एकट्याने एव्हरेस्टची चढाई सुरू केली. वजा 25 डिग्री सेल्सिअस तापमान, विरळ ऑक्सिजन अशा आव्हानांवर मात करीत शर्मा यांनी चढाईला सुरुवात केली.  सर्व नैसर्गिक संकटांवर मात करीत अखेर 20 मे 2016 रोजी सुहेल शर्मा यांनी एव्हरेस्ट सर केले. महाराष्ट्र पोलिस दलात सेवा सुरू केल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यात झाली. तेथे त्यांनी काही लहान मुलांचा ग्रुप बनवून त्यांना गिर्यारोहणाचे धडे दिले. त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. त्यांनी तयार केलेली मुलांनी नुकतीच एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली. याचा सार्थ अभिमानही त्यांना आहे. 

सांगलीतही उत्कृष्ट गिर्यारोहक बनविणार...

शर्मा यांनी नुकताच सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार घेतला आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवकांना साहसी खेळांत प्रोत्साहन देण्याचा त्यांना मानस आहे. चंद्रपूरप्रमाणेच सांगली जिल्ह्यातही एव्हरेस्ट सर करणारे उत्कृष्ट गिर्यारोहक तयार करण्यासाठी त्यांनी आराखडा तयार केला आहे. ते स्वतः युवकांना याबाबत मार्गदर्शन  व  प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी त्यांची पूर्वतयारी झाली असून लवकरच त्याचा अ‍ॅक्शन प्लॅन समोर येईल असे  त्यांनी सांगितले.