Wed, Jul 08, 2020 04:21होमपेज › Sangli › आता रस्सीखेच महापौरपदाची; सातजणी दावेदार

आता रस्सीखेच महापौरपदाची; सातजणी दावेदार

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 10:36PMसांगली : प्रतिनिधी

महापलिकेवर भाजपचा झेंडा फडकला. बहुमतानुसार आता भाजपचा महापौर होणार, हे स्पष्ट झाले आहे. महापौरपदाचासाठी अडीच वर्षे ओबीही महिला आरक्षण आहे. यानुसार निवडून आलेल्यांपैकी सातजणी या प्रवर्गातून महापौरपदाच्या दावेदार होऊ शकतात. यामध्ये भाजपश्रेष्ठी अनुभवींना संधी मिळणार, की नव्यांना संधी देऊन विकासाची वाटचाल करणार, हा उत्सुकतेचा विषय आहे. तरीही महापौरपदासाठी रस्सीखेच रंगणार, हे स्पष्ट आहे.

काँगे्रस-राष्ट्रवादीला दणका देत भाजपने 41 जागांसह महापालिकेची सत्ता मिळवली आहे. येत्या 13 ऑगस्टला महापालिकेच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी महापौरपदाची निवड पार पाडावी लागणार आहे. त्यानुसार आता  महापौरपदासह विविध पदे, समित्यांच्या पदांसाठी इच्छुकांची रस्सीखेच होणार, हे स्पष्ट आहे.दोन दिवसांत विजयाची हवा राहणार आहे. त्यानंतर पदे आणि विशेषत: महापौर निवडीच्या हालचाली सुरू होतील. यामध्ये महापौरपद  ओबीसी महिला प्रर्वगासाठी राखीव आहे. या प्रवर्गासाठी अकरा जागा राखीव होत्या. त्यापैकी सात जागांवर भाजपच्या उमेदवार निवडणूक आल्या आहेत. यातील एका नगरसेविकेला महापौर पदाची संधी मिळणार आहे. 

अडीच वर्षासाठी महापौर पदाचे आरक्षण आहे. त्यामुळे भाजपने ठरविल्यास किमान दोघजणींना  या पदावर संधी दिली जाऊ शकते. या प्रवर्गात भाजपकडून सौ. गीता सुयोग सुतार (प्रभाग 17), सविता मदने (प्रभाग 19) , अस्मिता सरगर (प्रभाग 4) , विद्यमान नगरसेविका संगीता खोत (प्रभाग 7), नगरसेविका अनारकली कुरणे (प्रभाग 10), कल्पना कोळेकर (प्रभाग 8), उर्मिला बेलवलकर (प्रभाग 14 ) व नसीमा नाईक (प्रभाग 18) या निवडून आल्या आहेत.

या सातजणींपैकी एकीची महापौरपदावर वर्णी लागणार, हे स्पष्ट आहे. त्यामध्ये पुन्हा सांगली, मिरजेला की कुपवाड या शहरांत महापौरपदाच्या संधीसाठी चुरस रंगेल. अर्थात यामध्ये भाजपमध्ये पुन्हा नव्या-जुन्यांचेही संधीमध्ये मेरिट ठरण्याची शक्यता आहे. आता एकीकडे गावभागात भाजपला घवघवीत यश देणार्‍या उर्मिला बेलवलकर, कुपवाडच्या प्रभाग 8 मधून विद्यमान नगरसेविकेचा पराभव करणार्‍या कल्पना कोळेकर, तसेच प्रभाग 19 च्या सविता मदने पक्षांतील जुन्या कार्यकर्त्या म्हणून दावेदार असतील. दुसरीकडे महापालिकेचा अनुभव असलेल्या दोन-तीन-टर्म काम केलेल्या नगरसेविका संगीता खोत, अनारकली कुरणे यांचेही ‘सिनियारिटी’चे मेरिट आहे. यातून कोणाला संधी द्यायची यावर नेत्यांचा खल रंगेल.

13 ऑगस्टपूर्वी निवड अत्यावश्यक

विद्यमान कार्यकारी मंडळाची 13 ऑगस्टला मुदत संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी महापौर निवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी तत्काळ विभागीय आयुक्‍तांकडे सर्वच पक्षांच्या सदस्य नोंदणी आणि त्यानंतर निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम लावण्यासाठी प्रशासनाला प्रस्ताव पाठवावा लागेल.