Sat, Jul 04, 2020 02:21होमपेज › Sangli › आघाडीची ताणाताण; युतीला सापडेना मुहूर्त 

आघाडीची ताणाताण; युतीला सापडेना मुहूर्त 

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 10:50PMसांगली ः अमृत चौगुले

एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा झाली असे म्हणत  असतानाच जागावाटपावरून ताणातणी सुरू आहे. दुसरीकडे मतविभागणी टाळून एकीची मोट बांधण्यासाठी भाजप नेत्यांनीही महायुतीचा विचार जाहीर केला. परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणालाच आमंत्रणच नाही. त्यामुळे युतीचा नव्हे तर चर्चेचाही अद्याप मुहूर्त नाही. सर्वच पक्षांना निवडणूक लढण्यासाठी आणि सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी स्व:बळ अपूर्ण आहे, याची जाणीव आहे. तरीही प्रत्येकाची स्व:बळाच्या पोकळ  दावा करीत  ताणाताणी सुरू आहे. 

अर्थात  आघाडी किंवा युती होवो अथवा न होवो उमेदवारी निश्‍चित आहे  त्यांना धोका न पत्करण्यासाठी युती किंवा आघाडी हवी आहे. ज्यांना आघाडी-युतीतून उमेदवारी मिळण्यात अडचण आहे त्यांनी ती न होण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत. ‘आघाडी झालीच अन् उमेदवारी न मिळाल्यास तुमच्याकडून’ अशा अन्य पक्षांनाही ऑफर देऊन त्यांनी दोन्ही डगरींवर हात ठेवले आहेत. 

सत्ताधारी काँग्रेसने सत्ता कायम ठेवण्यासाठी  मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. काँग्रेस नगरसेवकांचे संख्याबळ आणि इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसने  पुन्हा सत्ता मिळविण्याचा  दावा केला आहे. परंतु यावेळी डॉ. पतंगराव कदम, स्व. मदन पाटील यांच्या नेतृत्वाचा अभाव, केंद्र, राज्यात सत्ता नसल्याची अडचण  काँग्रेससमोर आहे. काँग्रेसकडून तरीही एकसंघ नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ. विश्‍वजित कदम,  जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांकडूनही उमेदवारीचा दावा करीत चार सदस्य पॅनेलची जमवाजमव सुरू  आहे.

राष्ट्रवादीनेही  त्यांच्याकडे  सध्या 24 नगरसेवक असले  तरी तळागाळात  ताकद मोठी असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे अन्य सर्वच पक्षांकडील नेतृत्वाचा अभाव आम्हाला फायदेशीर आहे, असा दावा शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील  करीत आहेत.  तरीही भाजपला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष मतांत फूट नको, याचीही खबरदारी घेत  दोन्ही पक्षांकडून आघाडीची चर्चा सुरू होती. मात्र आता  आचारसंहिता लागताच जागावाटपातच ताणाताणी सुरू झाली आहे.

दुसरीकडे भाजपने काँगे्रस-राष्ट्रवादीच्या महापालिकेतील कारभारावर जनतेत असलेल्या नाराजीचा फायदा घेण्याचा निधार्र्र केला आहे.  केंद्र, राज्यात आणि महापालिकेतही भाजपची सत्ता आणावी, म्हणजे  विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी जनतेला साद घालण्याची तयारी केली जात आहे. त्यादृष्टीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आदींनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेसाठी तब्बल 360 हून अधिकांनी  अर्जही भरले आहेत. मात्र, भाजपनेही काँग्रेस-राष्ट्रवादीतून आजी-माजी नगरसेवक, प्रबळ दावेदारांना इनकमिंग फॉर्म्युला अवलंबत उमेदवारीसाठी गळ लावला आहे.    

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास मतांचे भाजपविरोधी ध्रुवीकरण टळेल. यासाठी समविचारी मतांचे एकत्रीकरण करण्याकरिता  महायुतीचा फॉर्म्युला राबविण्याबाबत चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख यांनी सूचना केल्या होत्या. त्यादृष्टीने  रिपब्लिकन पक्ष आठवले गटाशी चर्चा सुरू ठेवली आहे. पण अन्य गट मात्र अद्याप दूर आहेत. 

युतीतील घटक शिवसेनेला राज्यस्तरावरील आणि स्थानिक पातळीवरूनही अद्याप विचारणाही झालेली नाही.  त्यामुळे शिवसेनेकडूनही स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू आहे. माजी आ. संभाजी पवार गटाची ताकद मोठी आहे. सोबतच शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने, जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांचीही ज्या-त्या प्रभागात ताकद आहे. अर्थात  युती झाल्यास   उमेदवारीवरून  रस्सीखेच राहणार आहे. यामुळे नाराजीचा सूर उमटू शकतो.  यादृष्टीने सर्वच पक्षांमधून आघाडी-युतीचे जसे पक्षासाठी फायदेशीर तसेच काही इच्छुकांसाठी फायदेशीर तर काहीजणांना मारक ठरणार आहे.  युती-आघाडीचा फैसला काय होईल, यावर सर्वच पक्षांची राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

आव्हान गटबाजी थोपविण्याचे

दोन्ही काँग्रेसकडे प्रभागनिहाय इच्छुक मोठे आहेत. काँग्रेसमधून 20 प्रभागात विद्यमान 43 जणांना जरी आरक्षणाची अडचण असली तरी खुल्या प्रवर्गातून दावा सुरूच आहे. भरीस भर म्हणून मागील निवडणुकीत पराभूत झालेले इच्छुक, दुसर्‍या फळीतील प्रसंगी विद्यमान नगरसेवकांपेक्षा प्रबळ इच्छुकांना संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी या सर्वांचे समाधान करताना आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या इच्छुकांचाही अडसर आहे. राष्ट्रवादीकडेही तीच अडचण आहे. त्यामुळे जागावाटपात ताणाताणी सुरू आहे.  दोन्ही पक्षांकडून प्रबळ असलेले दावेदार उमेदवारी न मिळाल्यास साहजिकच भाजप, शिवसेनेसह अन्य पक्षांकडेही जाऊ शकतात. त्यामुळे  जागावाटपाबरोबरच गटबाजी थोपविण्याचे मोठे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी समोर आहे.

सर्वांचेच ‘थंडा कर के खावो....’

आचारसंहिता लागू झाल्याने इच्छुकांची आता धावाधाव सुरू आहे. त्यादृष्टीने उमेदवारीसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांकडे तगदा सुरू झाला आहे. अर्थात 4 ते 11 जुलै या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत आहे. पण चार सदस्यीय पॅनेलमध्ये सर्वच ताकदवान उमेदवार असावेत, असा काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, जिल्हा सुधार समिती-आपसह  सर्वांचाच प्रयत्न सुरू आहे. अर्थात आघाडी-युतीचा फैसला झाल्यास उमेदवार इकडून तिकडे जाऊ शकतात. त्यामुळेच सर्वच नेत्यांकडून आघाडी-युतीचे ‘थंडा करके खाओ’ सुरू आहे. शेवटच्या क्षणी जरी कोणाला डावलले तर ऐनवेळी बंडखोरांची धावाधाव होणार नाही. गटबाजी आणि नाराजीचा सूर असला तरी उमेदवारीत थेट  बंडखोरी व  मतविभागणी टाळण्यासाठी हा फंडा ठरणार आहे.