Sat, Jul 04, 2020 01:11होमपेज › Sangli › आठ हॉटेल्सचे परवाने निलंबित

आठ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Published On: Nov 29 2018 12:59AM | Last Updated: Nov 29 2018 12:59AMसांगली : प्रतिनिधी

सांगलीसह जिल्ह्यातील आठ हॉटेल्स आणि धाब्यांचे परवाने दोन ते दहा दिवस निलंबित केले आहेत. अन्न-अस्वच्छता, खाद्यपदार्थांचा निकृष्ट दर्जा तसेच कागदपत्रांतील त्रुटींबद्दल ही कारवाई केल्याचे औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितले. नोटिसा देऊनही त्याची पूर्तता न केल्याबद्दल कारवाईचा हा बडगा उगारल्याचे ते म्हणाले.
चौगुले म्हणाले, जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, धाबे तसेच खाद्यपदार्थ विक्री, निर्मिती करणारी केंद्रे आणि हॉटेल्सची झाडाझडती करण्यासाठी पथके नेमली आहेत. त्यांतर्गत जिल्हाभर नियमित झाडाझडती सुरू आहे. सांगली, खानापूरसह विटा, कवठेमहांकाळसह अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आली.

चौगुले म्हणाले, तपासणीप्रसंगी अनेक हॉटेल्समध्ये आणि त्यांच्या स्वयंपाकगृहात अस्वच्छता आढळली. भाजीपाला आणि धान्यासह उपपदार्थांची अयोग्य पद्धतीने साठवण होती. खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत साशंकता होती. त्यामुळे निर्भेळ खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळत नव्हते. काही ठिकाणी कागदपत्रांचीही पूर्तता नव्हती. याबाबत सूचना देऊनही संबंधित हॉटेल्सच्या मालक, चालकांनी उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे दि. 10  डिसेंबर ते दि. 25 डिसेंबर या कालावधीत दोन ते दहा दिवस या हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. या कालावधीत या हॉटेल्सनी त्यांचे व्यवसाय बंद ठेवायचे आहेत. जर ते सुरू केल्याचे आढळले तर त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील.वरिष्ठ अन्नसुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, हिरेमठ, पवार, हाके यांच्या पथकाने ही कारवाई  केली.

या हॉटेल्सवर निलंबनाची कारवाई

हॉटेल शिवप्रेमी (खानापूर )- 2 दिवस,  हॉटेल निलसागर, बीअरबार, परमिटरूम  (विटा)-2 दिवस, हॉटेल ऐश्‍वर्या  (विटा)-2 दिवस, हॉटेल डायमंड, (विटा )-5 दिवस,  हॉटेल वुडहाऊस, गुलमोहोर कॉलनी (सांगली)- 10 दिवस,  महालक्ष्मी स्वीट मार्ट (कवठेमहांकाळ) -1 दिवस, हॉटेल न्यू अथर्व गार्डन ( शिरढोण)-1 दिवस.