होमपेज › Sangli › शेतकर्‍यांना भुर्दंड १ कोटीचा

शेतकर्‍यांना भुर्दंड १ कोटीचा

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 06 2018 10:27PMसांगली : उध्दव पाटील

सांगली मार्केट यार्डात हळदीची रोजची आवक 20 ते 25 हजार पोती आहे. यार्डात पाच गल्लींमध्ये अडत्यांची सव्वाशे-दीडशे दुकाने आहेत. दुकानापुढे सौदा निघाल्यानंतर पुन्हा फेर येण्यास आवकेनुसार 10 ते 25 दिवस लागतात. त्यामुळे सौद्याचा दिवस असलेल्या गल्लीत हळदीची पोती बैलगाडीतून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहतुकीवर वार्षिक 1 कोटी रुपये खर्च होत आहे. हा शेतकर्‍यांना विनाकारण भुर्दंड आहे. ‘निजामाबाद’ प्रमाणे ‘सांगली’तही हळदीचा ‘ई-लिलाव’ निघाल्यास वाहतुकीचा प्रश्‍नच उद्भवणार नाही. शेतकर्‍यांना कोटीचा भुर्दंड सोसावा लागणार नाही. ‘ई-लिलाव’ पध्दतीमुळे चांगला भावही मिळेल. 

सांगली मार्केट यार्ड हळदीसाठी प्रसिध्द आहे. सांगलीसह सातारा, जळगाव, नांदेड, परभणी व अन्य जिल्हे तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून हळदीची आवक होते. सांगली मार्केट यार्डात हळदीची वार्षिक आवक 15 लाख क्विंटल आहे. उलाढाल 1200 कोटी रुपयांची आहे. शेतीमालाची आवक झाल्यानंतर त्याच दिवशी सौदे होणे आवश्यक आहे. मात्र रोजची सुमारे वीस ते पंचवीस हजार पोती आवक, अडत्यांची शंभर ते दीडशे दुकाने यामुळे सौद्याचा फेर येण्यास दहा ते पंचवीस दिवस लागतात. आवक कमी असेल तर दहा दिवस आणि जास्त असेल तर पंचवीस दिवसांनी सौद्याचा फेर येतो.

त्यामुळे काही बड्या अडत्यांनी पाच-पाच फर्म (पेढी) काढल्या आहेत. प्रत्येक गल्लीमधील सौद्यात ते हळद मांडतात.  ज्या पेढीतील गल्लीत सौदा असेल तिथे बैलगाडीतून हळद नेतात. प्रत्येक लॉटमधील तीन-तीन पोती सौद्यात लावावी लागतात. एका पोत्याचा बैलगाडीतून वाहतुकीचा खर्च (नेणे - आणणे) 40 रुपये आहे. यार्डात गल्लीतील अंतर जास्त असेल म्हणजे गल्ली नंबर एकमधील पेढीतील हळद गल्ली नंबर 4 अथवा 5 पर्यंत नेण्यासाठी जादा 5 रुपये आकारले जातात. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बिल पट्टीतून कपात केली जाते. प्रचलित पद्धतीमुळे हा शेतकर्‍यांवर भुर्दंड आहे. 

निजामाबाद (तेलंगणा) प्रमाणे सांगलीतही ‘ई-लिलाव’ सुरू झाल्यास आवक झालेल्या हळदीची नोंदणी त्याच दिवशी बाजार समितीकडे होईल. दररोज ‘ई-लिलाव’ होईल. आवक होणारी हळद त्या-त्या दुकानात उपलब्ध असेल. खरेदीदार व्यापार्‍यांनी त्या-त्या दुकानात जाऊन गुणवत्ता पाहून ऑनलाईन दर नोंदवायचा. लॉटनिहाय सर्वाधिक दर नोंदवलेल्या खरेदीदाराची यादी ऑनलाईन प्रसिद्ध होईल व त्यानुसार विक्री होईल. प्रचलित पद्धतीप्रमाणे सौद्यासाठी दहा ते वीस दिवस वाट पहावी लागणार नाही.एका गल्लीतून दुसर्‍या गल्लीत हळद देण्याचा प्रश्‍नही उद्भवणार नाही. वाहतुकीवरील वार्षिक एक कोटींचा बोजा शेतकर्‍यांवर बसणार नाही. 

वाहतुकीच्या एक कोटी रुपयांची बचत हा ‘ई-लिलाव’चा हा पूरक फायदा आहे.  ई-लिलाव प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता, सुसुत्रता व अधिक स्पर्धा, लिलाव जलद होऊन सर्व घटकांच्या वेळेत बचत, स्पर्धात्मक दर हे फायदेही आहेत. सर्व व्यवहार नोंदणीकृत झाल्याने बाजार समित्यांचेही उत्पन्न वाढेल.

सांगली मार्केट यार्ड... हळद आवक, उलाढाल

सांगली मार्केट यार्डात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशातील आवक
सन 2016-17 : आवक- राजापुरी हळद- 5 लाख 10 हजार 893 क्विंटल परपेठ हळद - 1 लाख 9 हजार 256 क्विंटल
सन 2017-18: आवक- राजापुरी हळद- 11 लाख 32 हजार 158 क्विंटल परपेठ हळद- 3 लाख 71 हजार 438 क्विंटल

हळदीची वार्षिक उलाढाल : 1200 कोटी रुपये.

बेदाणा ई-लिलाव; प्रधानमंत्र्यांना दाखविण्यापुरता

‘ई-नाम’ अंतर्गत शेतीमालाच्या ‘ई-लिलाव’साठी पहिल्या टप्प्यातील बाजार समित्या : वर्धा, दौंड, वरोरा, नागपूर, अहमदनगर, नंदूरबार, कोल्हापूर, मलकापूर, वणी, परभणी, लोणंद, अकोला, लातूर, औरंगाबाद, तुमसर, शिरूर, नेवासा, येवला, अर्जुनी मोरगाव, सेलू, अचलपूर, बसमत, मालेगाव, गेवराई, आटपाडी, सांगली, भोकर, अहेरी, बार्शी, धुळे. 

‘ई-नाम’अंतर्गत ‘ई-लिलाव’साठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. सांगलीत बेदाण्याचा ‘ई-लिलाव’ सुरू असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. पण प्रत्यक्षात ‘ई-लिलाव’ऐवजी प्रचलित पध्दतीने दर पुकारून सौदा निघतो. प्रधानमंत्र्यांना दाखविण्यापुरताच बेदाण्याचा ‘ई-लिलाव’ काढण्यात आला. खरेतर बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अडते, व्यापार्‍यांशी संवाद साधला होता. ‘ई-लिलाव’साठी सर्वांनी सकारात्मक भूमिका  घेतली होती. पण प्रत्यक्षात इच्छाशक्तीच्या अभावाचे घोडे अडल्याचे दिसत आहे. 

 

Tags : sangli, sangli news, Turmeric, prices, E auction system,