Fri, Jul 10, 2020 02:40होमपेज › Sangli › मार्केट यार्डात शेतीमालाचा ‘ई-लिलाव’ कागदावरच

मार्केट यार्डात शेतीमालाचा ‘ई-लिलाव’ कागदावरच

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 11:06PMसांगली ः उध्दव पाटील

‘ई-नाम’ (राष्ट्रीय कृषी बाजार) हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. शेतीमालास चांगला दर मिळावा व शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती व्हावी हा उद्देश त्यामागे आहे. त्यासाठी शेतीमालाचे ऑनलाईन सौदे सुरू करण्याचे निर्देश आहेत. पहिल्या टप्प्यात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा ‘ई-नाम’मध्ये समावेश झालेला आहे. मात्र बेदाण्याचा ‘ई-लिलाव’ केवळ प्रात्यक्षिकापुरता निघाला. हळद, गूळ, मिरची, अन्नधान्य आदी शेतीमालाच्या  ऑनलाईन सौद्याचा अजून श्रीगणेशाही झालेला नाही.

केंद्र शासनाने शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषि बाजार योजना सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ सौद्याच्या ठिकाणी हजर असलेल्या खरेदीदारास भाग घेता येत आहे. नजिकच्या काळात ‘ई-लिलाव’ची व्याप्ती वाढून संपूर्ण महाराष्ट्र व त्यानंतर देशातील खरेदीदार व्यापार्‍यांना ‘ई-लिलाव’मध्ये ऑनलाईन सहभाग घेता येणार आहे. त्यातून खरेदीदार व्यापार्‍यांमध्ये स्पर्धा होईल व शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल. राज्यात  पहिल्या दोन टप्प्यात 85 बाजार समित्यांचा समावेश ‘ई-नाम’मध्ये झाला. आणखी 145 बाजार समित्याही ‘ई-नाम’ अंतर्गत जोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र प्रत्यक्षात शेतीमालाचा ‘ई-लिलाव’ कागदावरच राहिला आहे. 

केंद्र शासनाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीस सन 2016 मध्येच ‘ई-नाम’ समाविष्ट केलेले आहेेे. ‘ई-नाम’अंतर्गत तांत्रिक सज्जतेसाठी तीस लाख रुपयांचे अनुदानही दिलेले आहे. या अनुदानातून ‘ई-लिलाव’ यंत्रणा सज्ज झालेली आहे. सांगली बाजार समितीने पहिल्या टप्प्या ‘ई-लिलाव’साठी बेदाणा हा शेतीमाल घेतला आहे. मात्र केवळ प्रात्यक्षिकापुरताच ‘ई-लिलाव’ झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीतून सांगलीच्या बेदाण्याचा ‘ई-लिलाव’ पाहणार होते. त्यामुळे त्या ‘इव्हेंट’ पुरता बेदाण्याचा ‘ई-लिलाव’ झाला. त्यानंतर मात्र पुन्हा पारंपारिक पद्धतीने बोली लावूनच सौदे सुरू आहेत. 

बाजार समितीत आवक होणार्‍या सर्वच शेतीमालासाठी केंद्र, राज्य शासनाने ई-लिलाव अनिवार्य केला आहे. मात्र काही अडते, खरेदीदार व्यापारी या घटकांकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याची तक्रार बाजार समितीची आहे.  हळद, गूळ, मिरची, अन्नधान्य आदी सर्वच शेतीमालाचे ‘ई-लिलाव’ सुरू करण्याचे ‘पणन’चे आदेश आहेत. मात्र सांगलीत अजून हळद, गूळ, मिरची, अन्नधान्यच्या ‘ई-लिलाव’चा ‘श्रीगणेशा’ही झालेला नाही.