Mon, Dec 16, 2019 10:55होमपेज › Sangli › पुरेशा निर्यात अनुदानाभावी करपू लागले दूध 

पुरेशा निर्यात अनुदानाभावी करपू लागले दूध 

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 9:16PMसांगली :  विवेक दाभोळे

जागतिक बाजारात दुधाच्या भुकटीचे दर कोसळल्याने दूध  भुकटीच्या दरात अभूतपूर्व घसरण झाली आहे. आता जरी सरकारने प्रतिलिटर दुधासाठी भुकटीकरिता तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले असले तरी ते तुटपुंजेच असल्याची तिखट प्रतिक्रिया व्यक्‍त होते आहे. 

गेल्या सहा-सात महिन्यांपासून  शिल्लक साठ्याचा भुकटी तयार करणार्‍या प्रकल्पांना फटका बसू लागला आहे. भुकटीचे दर पडल्यामुळे दूध खरेदी करुन त्यापासून भुकटी तयार करण्यासाठी संघांना आता 3 रुपयेे 24 पैसे इतका प्रतिलिटर तोटा होतो आहे. यासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे. खरे तर दुधाचे वाढलेले दर देखील उत्पादकाला मिळत नसताना हे अनुदान प्रतिलिटर किमान 7 रुपये द्यायला हवे होते, अशी या क्षेत्रातील जाणकारांची प्रतिक्रिया आहे. साधारणपणे 100 लिटर दुधापासून साडे आठ किलो भुकटी तर 210 ग्रॅम लोणी तयार होते.

गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक तसेच जागतिक बाजारात देखील भुकटीचा दर कोसळला आहे. यामुळे  निर्यातीतून तोटाच  होतो आहे.  भरीत भर म्हणून सरकारने दुधाचा खरेदी दर वाढवून देखील त्यापेक्षा कमी दराने अनेक संघांकडून दुधाची खरेदी होत आहे. सरकारने कारवाईचे, प्रसंगी बरखास्तीचे इशारे देऊन देखील अनेक  संघांनी दाद दिली नव्हती. या सार्‍यात भर म्हणून ऐन उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन वाढल्याने दुधव्यवसाय देखील अभूतपूर्व कोंडीत सापडला आहेे तर याच दरम्यान, दूधउत्पादकांनी वाढीव दरासाठी आंदोलन सुरू केल्याने सरकारला निर्णय घेणे क्रमप्राप्त बनले होते. मात्र सरकारने प्रतिलिटर दुधासाठी 3 रुपये अनुदानाची घोषणा केली आहे.

सन 2014 सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. पावडरीचा जागतिक बाजारात  दर  पडला आहे. जवळपास तीनशे रुपये किलो दराने  विकली जात असलेली दुधाची पावडर आता 100 रुपये किलोच्या रेंजमध्ये आली आहे. याचा दूध व्यवसायाला फटका बसला आहे. 

दुष्काळात तेरावा महिना

महागडा चारा आणि पशुखाद्याचे महागडे दर यामुळे दुधाचा उत्पादन खर्च वाढला आहे. आता तर हिरवा चारा सातत्याने उपलब्ध असल्याने दुधाचे उत्पादन वाढले, मात्र जादा दर न देण्याच्या अनेक संघांच्या भूमिकेमुळे उत्पादन परवडत नाही. तर  पावडर निर्यात बंद असल्याने यासाठी दुधाची खरेदी ठप्प झाली आहे. यामुळे आता शिल्‍लक दुधाची समस्या निर्माण झाली आहे.  केवळ सांगली जिल्ह्यातच सरासरी प्रतिदिन 13 लाख लिटरच्या आसपास दुधाचे संकलन होते. निम्म्याहून जादा दूध पुणे-मुंबईच्या मार्केटमध्ये जाते, तितकेच पावडरीसाठी खरेदी  होते. पण निर्यात महागडी होत असल्याने  पावडर निर्मितीवर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

शासकीय दूध योजना सुरू करा 

मिरजेची शासकीय दूध योजना अनेक वर्षांपासून बंद आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर तयार केली जात होती. मात्र आता ही योजनाच बंद असल्याने पावडर निर्मिती ठप्प आहे. या ठिकाणी सारी यंत्रणा आहे, कामगार आहेत,  पण योजना बंद असल्याने या ठिकाणचा खर्च हा वायाच जात आहे. जर या ठिकाणी दूध खरेदी करून पावडर तयार करण्यास सुरुवात केली तर त्याचा जिल्ह्यातील उत्पादक आणि व्यावसायिकांना देखील मोठा दिलासा मिळेल. आता या ठिकाणी पावडर तयार केली जात नसल्याने नाईलाजाने वाहतुकीचा मोठा खर्च करुन अन्य ठिकाणी पावडर तयार करण्यासाठी दूध पाठवावे लागते.