होमपेज › Sangli › ड्रेनेज ठेकेदाराला १.२८ कोटी जीएसटीचा बेकायदा मोबदला

ड्रेनेज ठेकेदाराला १.२८ कोटी जीएसटीचा बेकायदा मोबदला

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
सांगली ः प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाने ठेकेदाराच्या मागणीनुसार त्याला चक्क 1.28 कोटी रुपयांचा जीएसटीचा बेकायदा मोबदला दिला आहे. 2017 मध्ये जीएसटी लागू झाली;  मात्र 2013 मध्ये काम सुरू केलेल्या ठेकेदाराला त्या कराची भरपाई का दिली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याने शासनाचा 1.28 कोटींचा अबकारी कर व महापालिकेची 15 लाखांची एलबीटीही बुडविल्याचे बिलांतून स्पष्ट झाले आहे. ड्रेनेज योजनेला दोनवेळा मुदतवाढ देऊनही कामे झाली नाहीत. दंड लावूनही 5.60 कोटी रुपयांची वसुली नाही. महासभेत बिले न देण्याचा ठराव देऊनही उधळपट्टी सुरूच आहे. एवढेच नव्हे तर भाववाढ न घेण्याची लेखी हमी देऊनही ठेकेदाराला 8 कोटी रुपयांचा वाढीव दराने मोबदला दिला आहे. 

जीवन प्राधीकरण सल्लागार व देखरेख एजन्सी म्हणून काम करते. त्यांनाही 2017 पर्यंत 1.98 कोटी रुपयांची फी दिली आहे. टेंडरची मुदत संपल्यामुळे प्राधीकरणाच्या मागणीनुसार त्यांना मासिक 3 लाख रुपयांप्रमाणे दोन वर्षांत सुमारे 72 लाखांचा मोबदला दिला आहे. तो सुरूच आहे. असे असूनही प्राधीकरण आणि मनपा प्रशासन ठेकेदाराची पाठराखण करीत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे.
ड्रेनेज ठेकेदाराने योजना सुरू झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात सुमारे 50 कोटी रुपयांच्या पाईप, साहित्य आणले. त्याचा 3 टक्के दराने 15 लाख  रुपयांचा एलबीटी महापालिकेने घेतलाच नाही. एवढेच नव्हे तर शासनाचा 1.18 कोटी रुपयांचा अबकारी कर (एक्साईज ड्युटी) ठेकेदाराने बुडविला. वास्तविक त्याबाबत शासनाच्या लेखापरीक्षणातही त्याबाबत हरकत आली होती. त्यावेळी शासनाचे काम करीत असल्याची बतावणी करून ठेकेदाराने हात झटकले.  

योजना 2013 मध्ये सर्व करांसह मंजूर केली होती. ती 2015 पर्यंत संपवायची होती. दोनवेळा मुदतवाढ देऊन 2017 पर्यंत ती संपविली नाही. आजअखेर पूर्ण झाली नाही. अर्थात सर्व साहित्य आणण्याचे काम 2017 पूर्वीच म्हणजे एलबीटीपूर्वीच झाले. तरीही ठेकेदाराने महापालिकेला पत्र देऊन 1.28 कोटी रुपयांचा जीएसटीचा मोबदला मागितला. याबाबत महापालिकेच्या प्रशासनाने यासंदर्भात कोणतीच खातरजमा न करता राजा उदार होऊन त्याला 1.28 कोटी रुपयांचा मोबदलाही दिला. एकूणच सर्वच मार्गांनी बेकायदा पद्धतीने लूट सुरूच आहे.