Mon, Jul 06, 2020 17:57होमपेज › Sangli › महापालिका भ्रष्टाचाराची खाण होऊ देऊ नका

महापालिका भ्रष्टाचाराची खाण होऊ देऊ नका

Published On: Oct 25 2018 1:22AM | Last Updated: Oct 25 2018 1:22AMसांगली : प्रतिनिधी

जनतेने शहराच्या विकासाच्या अपेक्षा ठेवत महापालिकेत परिवर्तन घडविले आहे. भाजपला पहिल्यांदाच सत्ता दिली आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षांचा भंग होऊ देऊ नका, पूर्वीच्या सत्ताधार्‍यांप्रमाणे महापालिका भ्रष्टाचाराची खाण होऊ देऊ नका, अशा कानपिचक्या मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप पदाधिकारी, नगरसेवकांना दिल्या. महापालिकेत भाजपची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर ते  प्रथमच  सांगली दौर्‍यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी भाजप नगरसेवक,पदाधिकार्‍यांची ओळख करून घेतली आणि  बैठकही घेतली.यावेळी सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपनेत्या नीता केळकर, महापौर सौ. संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर आदी उपस्थित होते.

बैठकीत नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी निधी द्यावा. विविध कामे मार्गी लावावीत आणि  जिल्ह्याला मंत्रिपद देण्याचीही  मागणी केली. फडणवीस म्हणाले, जनतेने भाजपला सत्ता देऊन तुम्हाला शहराच्या विकासाची संधी दिली आहे. मोठ्या प्रमाणात निधी आला म्हणजे जनता तुमच्याबाबत समाधानी असेल असे नाही. मी सुद्धा महापालिकेत नगरसेवक, महापौर म्हणून काम केले आहे. काम करताना जनतेच्या समस्या, अपेक्षांशी  तुमची नाळ घट्ट जुळली पाहिजे. तुमचा जनतेशी व्यवहार कसा आहे, जनतेला तुमची उपलब्धता किती आहे, यावर ते अवलंबून असते. मुख्यमंत्री म्हणाले, विकासकामे करताना पारदर्शीपणे  करा. भ्रष्टाचारमुक्त कामकाज झाले पाहिजे.  स्वच्छ, विकासाभिमुख प्रशासन दिले पाहिजे. यात कोठेही मागे-पुढे होता कामा नये. विकासकामांसाठी जो निधी लागेल तो द्यायला आणि त्यासाठी पाठपुरावा करायला सर्व नेते सक्षम आहेतच. मी तुमच्या निधीच्या अपेक्षा पूर्ण करून पाठबळ द्यायला सदैव तयार आहे. पण जनतेने तुम्हाला जी संधी दिली  आहे, त्याला कोठेही डाग लावू देऊ नका. 

ते म्हणाले, महापालिकेत विकासकामे करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. शहराचा आपण गतीने अल्पावधीत कायापालट करू. पण त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायला हवे. कोठेही त्यात वेगळे गट, चारजणांची तोंडे वेगळ्या दिशेला होता कामा नयेत. अर्थात तुमच्यात भांडणे व्हावीत, फूट पडावी यासाठी साहजिकच प्रयत्न होणार. पण ती संधी तुम्ही देऊ नका. तसे झाले तर मोठमोठी विकासकामे होऊन सांगली शहर अन्य महानगरांच्या स्पर्धेत उतरेल. यासाठी ताकदीने प्रयत्न करा.

आयुक्तांबद्दल तक्रार अन् समज देण्याचे आश्‍वासन

माजी महापौर विवेक कांबळे यांच्यासह काही नगरसेवकांनी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. ते म्हणाले, भाजपच्या रूपाने जनतेच्या परिवर्तनाच्या आशा होत्या, त्या पूर्ण झाल्या. पण, त्यासाठी जनतेला जी आश्‍वासने दिली होती, ती पूर्ण करण्यासाठी आयुक्त आडकाठी करीत आहेत. अनेक नगरसेवक नवीन आहेत. आयुक्त कोणत्याही प्रकारे सहकार्य करीत नाहीत. कामे मार्गी लावत नाहीत. यावर फडणवीस म्हणाले, त्यांना आम्ही योग्य ती समज देऊ. कामे गतीने होतील. त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल झालेला दिसेल.