होमपेज › Sangli › तासगाव, नागेवाडी बंद पाडणार्‍यांना धडा शिकवा

तासगाव, नागेवाडी बंद पाडणार्‍यांना धडा शिकवा

Published On: Apr 09 2019 1:59AM | Last Updated: Apr 08 2019 9:25PM




तासगाव : प्रतिनिधी

सभासदांच्या मालकीचा दीडशे कोटींचा तासगाव कारखाना 34 कोटींना स्वतःच्या खिशात घालणार्‍या व नागेवाडी कारखाना (यशवंत) बंद पाडणार्‍या खासदार संजय पाटील यांना घरात बसवा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केले. 

स्वाभिमानीचे उमेदवार विशाल   पाटील यांच्या प्रचार दौर्‍यादरम्यान हातनूर येथे झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी सरपंच उत्तमराव पाटील, काशिनाथ पाटील, आनंदराव पाटील, मच्छिंद्र पाटील, पंडित शिंदे, रंगराव पाटील, भारत साळुंखे, रमेश लोखंडे, दिलीप  पाटील, तानाजी पाटील उपस्थित होते. 

खराडे म्हणाले, खासदार संजय पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत कोणतेही विकासकाम केलेले नाही. दिनकरआबांनी मोठ्या कष्टाने तासगाव कारखाना उभा केला. सभासदांच्या मालकीचा हा दीडशे कोटींचा कारखाना त्यांनी 34 कोटीला विकत घेतला आहे. सहा कोटी रुपये राज्य बँकेत भरले आहेत. निवडणूक होताच हा व्यवहार पूर्ण केला जाणार आहे. परंतु हा व्यवहार पूर्ण होऊ देणार नाही. सांगली, तासगाव आणि अनेक ठिकाणी त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी घेतल्या आहेत. त्यांना आता निवडणुकीत जागा दाखवून द्या. खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर  लढाऊ खासदार म्हणून विशाल पाटील यांना निवडून द्या,  असे आवाहन केले.