Tue, Jul 14, 2020 05:20होमपेज › Sangli › ‘वर्षा’वर मतभेद संपले; आता राजकीय लढाई

‘वर्षा’वर मतभेद संपले; आता राजकीय लढाई

Published On: Mar 22 2019 1:53AM | Last Updated: Mar 22 2019 1:53AM
सांगली : प्रतिनिधी

भाजपअंतर्गत सर्व मतभेद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत संपले आहेत.  सांगली लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी महायुतीतर्फे आता राजकीय लढाई सुरू झाली आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

पक्षांतर्गत व सहयोगी पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांत  दिलजमाई झाल्याचे त्यांनी  सांगितले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील,  आमदार सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप,  अनिल बाबर, माजी आमदार नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दीपक शिंदे, मुन्ना कुरणे, अमोल बाबर, आरपीआयचे प्रदेश सचिव विवेक कांबळे, जगन्नाथ ठोकळे, भालचंद्र पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. देशमुख म्हणाले, महायुतीच्या प्रचाराचा दि. 24 मार्चरोजी कोल्हापुरात प्रारंभ होणार आहे.  त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  उपस्थित राहणार आहेत. 

त्या बैठकीच्या नियोजनासाठी आमदार  गाडगीळ यांच्या कार्यालयात आज बैठक पार पडली. बैठकीला सर्व मनपा, जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरताच सांगलीतून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. केंद्र, राज्य सरकार तसेच खासदार, आमदारांच्या कामामुळे जनतेतून मोठा प्रतिसाद मिळेल. गेल्या वेळेपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न राहतील.

भाजपमधील गटबाजी आणि वादाबाबत विचारता ते म्हणाले, मतप्रवाह कोणतेही असोत, प्रवाह शेवटी भाजपचाच आहे.  भाजपच्याच प्रवाहात सर्वजण आहोत. वर्षा बंगल्यावर हे सर्व मतभेद संपले आहेत. तसे वरून आदेश आले आहेत.  यापुढे सर्वजण एकमताने विजयासाठी प्रयत्न करू. 

आज उमेदवारी जाहीर; तासगाव, पलूसमध्ये बैठका

सांगलीतील भाजपच्या उमेदवारीबाबत विचारता देशमुख म्हणाले, भाजपमध्ये इच्छुक कोण हे विचारले जात नाही. वरूनच उमेदवार जाहीर होईल. त्याचा फैसला झाला आहे. शुक्रवारी नाव जाहीर होईल. त्यानुसार तासगाव आणि नंतर पलूस-कडेगाव येथे बैठका होतील. त्याच तालुक्यात बैठका का, या प्रश्नाचे उत्तर त्यांनीटाळले. माजी मंत्री अजितराव घोरपडे व गोपीचंद पडळकर भाजपवर नाराज आहेत. त्याबद्दल विचारता ते म्हणाले, त्यांना भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू.