Fri, Jul 10, 2020 18:52होमपेज › Sangli › इस्लामपूर  प्रशासकीय इमारतीत  अस्वच्छता

इस्लामपूर  प्रशासकीय इमारतीत  अस्वच्छता

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 11:24PMइस्लामपूर : संदीप माने

प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीने व  अस्वच्छतेने कार्यालयातील कर्मचार्‍यांबरोबर  या आवारात कामांसाठी येणारे सामान्य लोकही वैतागून गेले आहेत.पेठ-सांगली मार्गावरील या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शिराळा, वाळवा तालुक्यातून दररोज शेकडोंच्या संख्येने नागरिक, विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. इमारतीत लिफ्टची सोय नाही.  वयोवृद्धांची तिसर्‍या मजल्यावर तहसील कार्यालयाचे दालन गाठताना दमछाक होत आहे. काही वयोवृद्धांना   नातेवाईकांना उचलूनच कार्यालयापर्यंत न्यावे लागते.

मध्यवर्ती इमारतीतील भिंतीचे कोपरे  गुटखा, मावा, पान, तंबाखूने रंगले आहेत.  खिडक्यांची अवस्थाही तशीच आहे. कार्यालयाच्या बाहेरील  परिसरात अस्वच्छता असून तेथे असणार्‍या पत्र्याच्या शेडमध्ये कुत्री पहुडलेली असतात. लोकांची वर्दळ मोठी  असताना   इमारतीतील स्वच्छतागृह  अपुरे पडत आहे. त्यामुळे तेथे येणार्‍यांची  गैरसोय होत आहे. तेथील स्वच्छतागृह, शौचालयात अस्वच्छता आहे. त्याची दुर्गंधी कार्यालय परिसरात कायम जाणवत असते. इमारतीत ड्रेनेज व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. पार्किंगच्या ठिकाणी स्टॅम्प व्हेंडर बसत असल्याने ती व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. 

सीसीटीव्ही कॅमेरे नावालाच...

परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. अस्वच्छता करणारे कॅमेर्‍यात कैद होत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. पान, गुटखा, मावा खाऊन अस्वच्छता करण्यात काही कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. 

स्वच्छता करण्यावरून वाद...

प्रशासकीय इमारतीची स्वच्छता करण्यावरून  प्रांत कार्यालय व तहसील कर्मचार्‍यांच्यात मतभेद आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी भेट दिली होती. भेटीदरम्यान कार्यालय परिसरातील, कार्यालयातील अस्वच्छता पाहून त्यांनी संबंधितांना चांगलेच सुनावले होते.  संबंधित कर्मचार्‍यांचे पगारही कपात केले असल्याचे एका महसूल अधिकार्‍याने सांगितले. इमारतीच्या प्रवेशद्वारालगत व अन्य काही ठिकाणी दर पावसाळ्यात गळती लागल्याचेही दिसून आले आहे.