Thu, Jul 02, 2020 10:50होमपेज › Sangli › धनंजय, विभावरी कुलकर्णी यांना कोठडी

धनंजय, विभावरी कुलकर्णी यांना कोठडी

Published On: Dec 07 2018 1:51AM | Last Updated: Dec 06 2018 11:36PM
सांगली : वार्ताहर

साईनाथ महिला पतसंस्थेचे संस्थापक धनंजय कुलकर्णी आणि अध्यक्ष विभावरी धनंजय कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडीत (कारागृह) पाठविण्यात आले. दि. 12 डिसेंबर पासून त्यांच्या विरुद्धच्या खटल्याची सुनावणी रोजच्या रोज घेण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने  गुरुवारी दिले. 

साईनाथ महिला पतसंस्थेच्या ठेवी न दिल्याबद्दलच्या अनेक तक्रारींची सुनावणी ग्राहक न्यायालयात सुरू आहे. अनेक तक्रारींचा निकाल यापूर्वीच लागलेला आहे. ठेवीदारांची ठेव व्याजासह परत करण्याचे आदेश देखील झालेले आहेत.धनंजय कुलकर्णी व विभावरी कुलकर्णी वगळता अन्य संचालकांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरल्याने अन्य संचालकांना काही खटल्यातून न्यायालयाने वगळले आहे. या तक्रारीपैकी दोन तक्रारींची आज सुनावणी होती. 

दरम्यान प्रमोद कुलकर्णी,  माधव चौगुले, चंद्रकांत देशपांडे, हाजीसाहेब नदाफ , प्रभाकर कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा निर्णय यापूर्वीच झाला होता.  त्यापैकी काही तक्रारादांच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप जाधव यांनी काम पाहिले होते.त्या निर्णयाप्रमाणे ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने धनंजय व विभावरी कुलकर्णी यांच्याविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 अन्वये दोघांना शिक्षा व्हावी यासाठीच्या खटल्याची सुनावणी प्रलंबित आहे. वारंवार आदेश देऊन देखील कुलकर्णी दाम्पत्य सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत होते. त्यामुळे न्यायालयाने सुरुवातीला कॉस्ट (दंडाची भरपाई) भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर पकड वॉरंटचे आदेश दिले.  या निर्णयाविरुध्द कुलकर्णी यांनी राज्य ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती.  

पकड वॉरंटचे आदेश रद्द करण्यास ग्राहक आयोगाने नकार दिला. तसेच सांगली येथील ग्राहक न्यायालयात हजर राहून वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार कुलकर्णी दाम्पत्य आज न्यायालयासमोर हजर झाले. न्यायालयाने पकड वॉरंटचा आदेश रद्द करुन त्यांंना ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत (सांगली कारागृहात) पाठविले. 
दि.12 डिसेंबरपासून या 7 खटल्यांची सुनावणी रोजच्या रोज सुरू करुन लवकरात लवकर खटल्याचा निर्णय देण्याचे आदेश अनिल खडसे यांच्या अध्यक्षतेखालील श्रीकांत कुंभार व सुरेखा हजारे  यांच्या पिठाने दिले.