होमपेज › Sangli › सांगली : सावळजमध्ये सापडला डेटोनेटर, जिलेटीनचा साठा 

सांगली : सावळजमध्ये सापडला डेटोनेटर,जिलेटीनचा साठा 

Published On: Apr 04 2019 2:02AM | Last Updated: Apr 03 2019 7:08PM
तासगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांच्या पथकाने सावळज येथे छापा टाकला असता ४४७ डेटोनेटर आणि ५८७ जिलेटीन कांड्यांचा बेकायदेशीर साठा सापडला. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानातील दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एका ट्रॅक्टरसह ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर आणि पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान अटक केलेल्या शंकरलाल लालूराम गुजर (वय २८) आणि रतनलाल लालूराम गुजर (वय २६, दोघेही रा. सध्या सावळज (मूळ गाव बक्कान, ता. रायपूर, जिल्हा बिलवाडा राजस्थान) यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आचार संहितेच्या अनुशंगाने तालुक्यात सर्वत्रच पोलिस पेट्रोलींग करत आहेत. यावेळी सावळज - डोंगरसोनी रस्त्यालगत एका खोली मध्ये डेटोनेटर आणि जिलेटीन कांड्यांचा बेकायदेशीर साठा केल्याची माहिती मिळाली. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शंकरलाल व रतनलाल यांची खोली आणि ट्रॅक्टरमध्ये (आर जे ०६ आय आर - १२१७) हा साठा सापडला. सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले, पोलिस हवालदार काका रुपनर, पोलिस नाईक रमेश चव्हाण, दरिबा बंडगर, सोमनाथ गुंडे, विनोद सकटे, सतिश खोत, अशोक सूर्यवंशी, महेश निकम, विजय पाटील यांच्या पथकाने हा छापा टाकला होता.