Sun, Dec 17, 2017 08:01होमपेज › Sangli › प्रोत्साहन अनुदानातील २७ हजार शेतकरी वगळले

प्रोत्साहन अनुदानातील २७ हजार शेतकरी वगळले

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:56PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाची तिसर्‍या टप्प्यातील यादी बुधवारी जिल्हा बँकेच्या लॉगिनवर आली होती. मात्र गुरुवारी सुधारित यादी आली. सुधारित यादीत 38 हजार 807 शेतकर्‍यांचा समावेश असून 26 हजार 738 शेतकरी वगळले आहेत. तांत्रिक चुकांमुळे ही नावे वगळली आहेत. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचा चौथा टप्पाही लवकरच प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाच्या तिसर्‍या टप्प्यात जिल्ह्यात 80 हजार 89 शेतकर्‍यांचा समावेश होता. बुधवारी या शेतकर्‍यांची यादी जिल्हा बँकेच्या लॉगिनवर शासनाकडून आली होती. मात्र गुरुवारी शासनाकडून सुधारित यादी जिल्हा बँकेच्या लॉगिनवर झळकली. या सुधारित यादीनुसार कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान वर्ग करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही शासन स्तरावरून आल्या. बुधवारच्या यादीनुसार 65 हजार 545 शेतकर्‍यांना 101 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर झाले होते. 101 कोटींपैकी 51.71 कोटी रुपये जिल्हा बँकेकडे वर्गही झाले होते. 

मात्र शेतकर्‍यांच्या नावापुढे बँकेची शाखा, विकास सोसायटीचे नाव नसणे व काही अन्य त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे शासनाने सुधारित यादी पाठविली. या यादीतील 38 हजार 807 शेतकर्‍यांना 54.59 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. 

जिल्हा बँकेला प्रोत्साहन अनुदान फरकाचे 2.88 कोटी मिळणार

जिल्हा बँकेला तिसर्‍या टप्प्यातील यादीतील शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदानाचे 51.71 कोटी रुपये आले आहेत. मात्र प्रत्यक्षात 38 हजार 807 शेतकर्‍यांच्या बचत खात्यावर 54.59 कोटी अनुदान वर्ग करायचे आहे. फरकाचे 2.88 कोटी रुपये शासन जिल्हा बँकेला देणार आहे.  

दरम्यान सुधारित यादीतील शेतकर्‍यांची नावे आणि कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाची माहिती जिल्हा बँकेने शाखांना व शाखांनी विकास सोसायट्यांकडे पाठविली आहे. त्यानुसार शहानिशा करून कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.