Wed, Jul 08, 2020 16:00होमपेज › Sangli › नागजमध्ये युवकाचा मृत्यू; युवती गंभीर

नागजमध्ये युवकाचा मृत्यू; युवती गंभीर

Published On: Mar 30 2019 1:31AM | Last Updated: Mar 29 2019 11:18PM
नागज : वार्ताहर

सांगोला तालुक्यातील प्रेमी युगुलाने नागज (कवठे महांकाळ) येथील निर्जन स्थळी विषारी द्रव प्राशन केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. प्रियकर रोहित सोमनाथ गवळी (वय 18, रा, शिवाजीनगर, सांगोला) याचा जागीच मृत्यू झाला. प्रेयसी प्रियांका विठ्ठल व्हनमाने (वय 18, रा. जुनोनी, ता. सांगोला) ही मिरज येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली  माहिती अशी : रोहित हा शुक्रवारी सकाळी सहा वाजता कॉलेजला जातो असे सांगून मोटारसायकल (एमएच 45 एए 3728) वरून सांगोला येथून निघाला. त्यानंतर तो जुनोनी येथील प्रेयसीला बरोबर घेऊन नागजच्या दिशेने आला.

नागज येथे मिरज-पंढरपूर राज्य मार्गापासून सुमारे पाचशे फूट अंतरावर मोटारसायकल थांबवून त्या दोघांनीही निर्जन स्थळी जाऊन विषारी द्रव प्राशन केले. दरम्यान, रोहितचा जागीच मृत्यू झाला. प्रियांकाने औषध पिल्यानंतर जुनोनी येथील चुलत्यांना फोन केला.त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी येऊन तिला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रूग्णालयात नेले.तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 

या घटनेची माहिती नागजचे पोलिस पाटील दीपक शिंदे यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना दिली.घटनास्थळी रोहितच्या मृतदेहाजवळ कॉलेजची बॅग,पाण्याची बाटली व नुवान (डायक्लारोव्हास) या विषारी द्रवाची बाटली पडली होती.सुमारे शंभर फूट अंतरावर मोटारसायकल होती.रोहितने बॅगेमध्ये चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत त्याने आई-वडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केले असे लिहिले आहे.‘माय लव्हर इज माय हार्ट ’ हे एकच वाक्य प्रेयशीला उद्देशून लिहिले आहे.या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.