Sun, Apr 21, 2019 06:01होमपेज › Sangli › भाऊबीजसाठी जाताना बहिणीवर काळाचा घाला

भाऊबीजसाठी जाताना बहिणीवर काळाचा घाला

Published On: Nov 09 2018 6:56PM | Last Updated: Nov 09 2018 7:01PMतासगाव (सांगली) : प्रतिनिधी

भाऊबीजेसाठी माहेरी जात असताना दुचाकीवरून पडून बसखाली चिरडल्याने बहिणीवर काळाने घाला घातला. माया शिवाजी चव्हाण (वय-४५ रा. अलकुड एम ता. कवठेमहांकाळ) असे या महिलेचे नाव आहे. ही दुर्देवी घटना आज, शुक्रवारी (दि ९) सकाळच्या सुमारास तासगाव शहरातील गणपती मंदिराजवळ घडली. तासगाव पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. ऐन सणासुदीत घडलेल्या या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. तासगाव शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांकडे नगरपालिका व स्वच्छता कंत्राटदाराने केलेल्या दुर्लक्षामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.  

अलकुड एम येथील धनंजय शिवाजी चव्हाण आणि त्यांची आई माया शिवाजी चव्हाण या भाऊबीज सणासाठी कार्वे (ता. विटा) आपल्या भावाकडे निघाल्या होत्या. तासगाव शहरातील गणपती मंदिरजवळ नगरपालिकेच्या ड्रेनेजचा एक भला मोठा खड्डा आहे. या खड्ड्यात गाडी आदळल्याने माया चव्हाण दुचाकीवरून खाली पडल्या. यावेळी विटा आगाराची सांगलीहुन तासगावकडे येणारी बस (क्रमांक- एम् एच १४ बी टी २८२३) पाठीमागे होती. दुचाकीवरून खाली पडल्याने माया चव्हाण या एसटी खाली चिरडल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

ठेकेदारावर कारवाईची मागणी

शहरातील रस्त्यावर दुकानदारांनी टाकलेले नारळाचे फड स्वच्छता ठेकेदारांनी उचलले असते तर ही दुर्घटना घडली नसती. ठेकेदाराच्या गलथानपणामुळे हा बळी गेला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.