Thu, Jul 02, 2020 11:21होमपेज › Sangli › दादा-बापू वाद संपला; विशाल पाटील यांच्या पाठीशी रहा

दादा-बापू वाद संपला; विशाल पाटील यांच्या पाठीशी रहा

Published On: Apr 03 2019 1:51AM | Last Updated: Apr 02 2019 9:19PM
सांगली : प्रतिनिधी

दादा-बापू वाद संपला आहे, त्यामुळे आपण सर्वजण विशाल पाटील यांच्या पाठीशी राहूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी येथे केले. भाजपमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्वाभिमानी पक्षाचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विशाल पाटील यांचा अर्ज दाखल करून प्रचार प्रारंभ मंगळवारी करण्यात आला. यासाठी स्टेशन चौकात मान्यवर नेत्यांची जाहीर सभा झाली. 

आ. विश्‍वजित कदम, आ. सुमन पाटील, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, महांकाली समुहाच्या अध्यक्षा अनिता सगरे, जयश्री पाटील,  शैलजा  पाटील, सत्यजित देशमुख, पी. एन. पाटील, प्रतीक पाटील, प्रा. सिध्दार्थ जाधव,  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, सावकार मादनाईक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मागे बघून राजकारण करणार्‍याला भविष्य नसते. भविष्याकडे पाहून राजकारण करायचे असते. दादा-बापू घराण्यांच्या वादाबाबतही माझे असेच मत आहे. हा वाद माझ्यासाठी संपला आहे. दादा व बापू विचाराने एक होते. ते जिल्ह्यात दुसर्‍या कोणाला येऊ देत नव्हते. त्याप्रमाणे भाजपची तिसरी शक्ती जिल्ह्यात येऊ नये यासाठी हा वाद आता संपला आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांने गैरमेळ न करता विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम राहावे.

ते पुढे म्हणाले, भाजपकडून देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला जात आहे. मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास देशात लोकशाही राहणार नाही. मराठा, धनगर, मुस्लिम अशा प्रत्येक समाजाची फसवणूक या सरकारने केली आहे. भाजप सरकारच्या मेक इन इंडिया, मेन इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र,  रोजगार अशा अनेक योजना फसल्या आहेत. नोटाबंदी, जीएसटी, महागाई यामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाचे भविष्य ठरविणारी आहे. जनतेने याचा गांभिर्याने विचार करावा. 

खा. राजू शेट्टी म्हणाले, भाजपने शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला आहे. त्यांना साथ दिली ही माझ्या आयुष्यातील घोडचूक होती. भाजपच्या राजवटीत लोकांना अच्छे दिन नव्हे; तर लुच्चे दिन आले आहेत. त्यामुळे संघटनेने रुजविलेल्या कमळावर शेतकरी आता तणनाशक फवारणार आहेत. शेट्टी म्हणाले,  मी चुकून भाजपच्या कळपात गेलो होतो. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक होती. त्यांनी अच्छे दिनाच्या भूलथापा मारल्याने आम्ही भुललो होतो. पण काही दिवसांत त्यांचे खरे स्वरुप दिसून आले. भाजप इतके थापाडे कोणी नसेल. शेतकर्‍यांचा मोठा विश्‍वासघात या सरकारने केला आहे. ज्यावेळी यांचे वास्तव समजले त्यावेळी मी सत्तेतून बाहेर पडलो. भाजपच्या राजवटीत लोकांना अच्छे दिन नव्हे; तर लुच्चे दिन आले आहेत. त्यांची सत्ता पुन्हा आली तर देशात लोकशाही जिवंत राहणार नाही. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा हे बरे म्हणून महाआघाडीत सहभागी झालो आहे. आघाडीतील नेत्यांच्या मांडीला-मांडी लावून बसणे परवडेल, पण भाजपसारखी फॅसिस्ट प्रवृत्ती नको. कारण ते सर्वच संपवायला निघाले आहेत. सत्ता टिकवण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. सद्दाम हुसेनप्रमाणे यांना देश चालवायचा आहे. त्यामुळे यांच्या हातात देश देणे धोक्याचे आहे.  भाजपचा हा सत्तेचा उन्माद थांबविण्याची गरज आहे.

शेट्टी म्हणाले, शेतकरी ज्याप्रमाणे लावण  करू शकतो, त्याचप्रमाणे फवारणीही चांगली करतो. भाजपला कंटाळलेला शेतकरी आता तणनाशक फवारून कमळाला संपवून टाकणार आहे.  बॅटने जोरदार बॅटिंग करुन भाजपचे लगान फेडून शेतकर्‍यांना यांच्या जाचातून मुक्त करणार आहे. आमदार सुमन पाटील म्हणाल्या, जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे विशाल पाटील यांना मताधिक्य देवू. जयश्री पाटील म्हणाल्या, हुकूमशाहीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. 

माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले, जनता हुशार आहे, तिला काय करायचे हे माहीत आहे. त्यामुळे आता नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. प्रकाश आवाडे म्हणाले, काँग्रेस पक्ष दादा घराण्याला कधीच सोडणार नाही.  गेल्या वेळी देशात भाजपला केवळ 31.5 टक्के मते मिळाली आहेत. विरोधकांना 68.5 टक्के मते मिळाली आहेत. आता मतविभागणी करण्याचा डाव रचला आहे. भाजप सरकारने दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे देशातील जनता भाजपविरोधात पेटून उठली आहे. जनता केवळ मतदानाच्या दिवसाची वाट पाहते आहे. नेत्यांनीही मनुवादी सरकार घालवण्यासाठी एकसंघ राहण्याची गरज आहे.  विक्रम सावंत म्हणाले, जत तालुक्यात प्रामाणिकपणे काम करुन मताधिक्य देऊ. कमलाकर पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी आदेश दिल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील शंका दूर झाली आहे. मतभेदाचे विषय संपले आहेत. माजी महापौर सुरेश पाटील, क्रांती उद्योग समुहाचे अरुण लाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, ताजुद्दीन तांबोळी, आकाराम मासाळ, विष्णू माने, मनोज शिंदे यांची भाषणे झाली. महेश खराडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सभेला माजी महापौर किशोर शहा, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, श्रीनिवास पाटील, पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते, महावीर पाटील, जयकुमार कोले, संदीप राजोबा, महेश जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्ध्याच्या सभेवरून देशाची लाट कळली 

जयंत पाटील व डॉ. भारत पाटणकर म्हणाले, वर्ध्यातील नरेंद्र मोदी यांच्या सभेने देशाच्या हवेचा रोख कळला आहे. हे सरकार आता राहत नाही, हे निश्‍चित झाले आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, 3ते 4 लाख लोक येणार्‍या मोदींच्या सभेला वर्ध्यात केवळ 30ते 40 हजार लोक उपस्थित होते. यावरून देशाची लाट आता कळू लागली आहे.

पलूस - कडेगावमधून लीड देणार : आ. विश्‍वजित कदम

पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले,  खा. शेट्टी यांनी सर्वांना एकत्र आणण्याची किमया केली आहे. आम्ही विशाल यांच्या पाठीशी आहोत. प्रामाणिकपणे काम करुन त्यांना पलूस-कडेगावमधून लीड देऊ. पण त्यांनी खासदार झाल्यावर विसरू नये. कारण बॅटिंग करण्याची संधी सर्वांना मिळते.