इस्लामपूर : शहर वार्ताहर
कडकनाथ कोंबडी व्यवसायातही गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि.कंपनीच्या संचालकांवर महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण (एमपीआयडी) कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. संचालकांची बँक खातीही गोठविण्यात आली आहेत.
दरम्यान, कंपनीचा संचालक संदीप मोहिते याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत आठ दिवसांची वाढ केली आहे.
महारयत अॅग्रो कंपनीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातही शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकार्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यांनी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी चर्चा केली. फसवणुकीच्या रकमेचा आकडा 8 कोटींपेक्षा अधिक झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
संस्थापक संचालक मुख्य सूत्रधार सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते, संचालक हणमंत शंकर जगदाळे, एजंट गणेश हौसेराव शेवाळे, पुणे कार्यालयाचा प्रमुख विजय ज्ञानदेव शेंडे यांच्या विरोधात इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद आहे. संचालक हणमंत जगदाळे याला न्यायालयाने दि. 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मोहिते याला पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले. त्याच्या कोठडीत दि. 11 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
कंपनीचा महारयत अॅग्रो व या कंपनीच्या अंगीकृत येणार्या इतर कंपन्यांचेही व्यवहार गोठविण्यात आले आहेत. कंपनीचा संस्थापक व मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते व पुणे कार्यालयाचा प्रमुख विजय शेंडे याच्या खात्यावर मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हे दोघे व एजंट गणेश शेवाळे हे अद्याप फरारी आहेत.
गुंतवणूकदार संरक्षण कायद्याअंतर्गत संचालकावर गुन्हे दाखल केल्याने पोलिसांना तपासासाठी अधिक वेळ मिळणार आहे. संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार प्रशासनाला मिळाला आहे.
- नारायण देशमुख
पोलिस निरीक्षक, इस्लामपूर.