Mon, Jul 06, 2020 16:59होमपेज › Sangli › बनावट चलन : दोन लिपिकांवर गुन्हा 

बनावट चलन : दोन लिपिकांवर गुन्हा 

Published On: Apr 17 2019 2:05AM | Last Updated: Apr 17 2019 2:04AM
 जत : शहर प्रतिनिधी 

येथील वाळू तस्करी दंड आणि बोगस चलन प्रकरणात जत महसूल विभागातील अव्वल कारकून बिपीन मुगळीकर व लिपिक लक्ष्मण भंवर या दोन कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचे निष्पन्‍न झाले आहे. जत पोलिसांत या दोघांवर गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अवैध वाळू उत्खनन करताना पकडलेल्या वाहन चालकांनी दंडाची रक्‍कम न भरताच बोगस चलन सादर केले होते. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात पाच  आणि उमदी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. पाच वाहनमालकांना अटक केली असून तिघे फरार आहेत. 

तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अनिल माने यांनी माहिती दिली की, वाहनमालकांकडे  केलेल्या चौकशीत  मुगळीकर व भंवर या कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचे निष्पन्‍न झाल्याने 
त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शासन नियमानुसार  कर्मचार्‍यांनी चलन देणे गरजेचे आहे.  त्यांनी वाहनधारकांकडून दंडाची रक्‍कम बेकायदेशीरपणे स्वीकारून बनावट शिक्के करून बनावट चलन तयार केली आहेत. दोन्ही  कर्मचार्‍यांचा या प्रकरणात सहभाग असल्याने त्यांच्यावर  गुन्हा दाखल केला आहे.

माने म्हणाले, की  अवैध वाळू उत्खनन केल्याने जत तहसील कार्यालयाने आठ जणांवर दंडात्मक कारवाई केली होती. तो दंड  स्टेट बँकेत चलनाने भरण्याचा नियम आहे.दंड भरल्याचे  चलन दाखविल्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहीने जप्त वाहन सोडले जाते. मात्र, या प्रकरणात बोगस शिक्‍का वापरून चलन देत वाहने सोडली आहेत.जत तहसील व संख अप्पर कार्यालयातील 26 लाख रुपये शासनाकडे जमा झालेले नाहीत. यात  कर्मचार्‍यांबरोबर वरिष्ठ अधिकार्‍यांनीही निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. चलनाची शहानिशा  न करता कर्मचार्‍यांवर विश्‍वास ठेवत  त्यांनी  कागदांवर सह्या केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी उमदी पोलिसात अटकेत असलेले बेळुंखी व बिराजदार यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जत पोलिसांच्या  ताब्यात असलेल्या  तिघांना दि. 17 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.