Mon, Dec 16, 2019 10:55होमपेज › Sangli › नगरसेवकाचे मनपासमोर ठिय्या आंदोलन

नगरसेवकाचे मनपासमोर ठिय्या आंदोलन

Published On: Nov 29 2018 12:59AM | Last Updated: Nov 28 2018 10:51PMमिरज : प्रतिनिधी

महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी मधल्या वेळेत उपस्थित नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नागरिकांसह कार्यालयासमोर रस्त्यावर बुधवारी ठिय्या आंदोलन केले.

थोरात यांनी गेल्या दोन दिवसांपासून मिरज विभागीय कार्यालयात कामासाठी महापालिकेत येणार्‍या नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारीवरुन चौकशी केली. दुपारच्या वेळेत दोन तास कोणी अधिकारी, कर्मचारी नसतात असे निदर्शनास आले. बुधवारी 4 वाजेपर्यंत बरेच अधिकारी, कर्मचारी कार्यालयात आले नव्हते. त्यामुळे   कामासाठी  येणार्‍या  नागरिकांना बरोबर घेऊन त्यांनी दरवाजातच रस्त्यावर ठिय्या मारला. काही अधिकारी, कर्मचार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. तसेच काही कर्मचारी काम चुकविण्याकरिता वेगवेगळी कारणे सांगून दोन-दोन तास कार्यालयात नसतात. हे सर्व प्रकार बंद झाले पाहिजेत, असे थोरात यांनी अधिकार्‍यांना ठणकावून सांगितले. 

आंदोलन सुरू झाल्याचे समजल्यानंतर अधिकार्‍यांची एकच धांदल उडाली. हजर असलेल्या अधिकार्‍यांनी संबंधितांना फोन करून बोलावून घेतले. अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे अधिकार्‍यांची तारांबळ उडाली होती. शहरातील नागरिकांना कामासाठी वारंवार महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा काम होत नाही, तर काही वेळा अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसतात. प्रभागातील कामानिमित्त नगरसेवक थोरात हे महापालिकेत दुपारी गेले होते. त्यावेळी विभागात कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे वाट पाहून दमलेल्या नगरसेवक थोरात यांनी नागरिकांसोबत आंदोलन करुन नागरिकांची कामे मार्गी लावली.