होमपेज › Sangli › नगराध्यक्ष-पक्षप्रतोदांच्यातील वादावर पडदा

नगराध्यक्ष-पक्षप्रतोदांच्यातील वादावर पडदा

Published On: Jun 19 2018 1:24AM | Last Updated: Jun 18 2018 11:11PM



इस्लामपूर : वार्ताहर

ना. सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीनंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील व विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यातील वादावर सोमवारी पडदा पडला. यापुढील काळात मतभेद विसरून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करू. नागरिकांनी टाकलेल्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही,  असा विश्‍वास नगराध्यक्ष निशिकांत पाटील व पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी  पत्रकार बैठकीत व्यक्त केला.

पालिका सभेत नगराध्यक्ष निशिकांत पाटील व पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यामुळे विकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर सोमवारी ना. सदाभाऊ खोत यांनी नगराध्यक्ष व पक्षप्रतोदांना एकत्रित घेऊन दोघांच्यातील मतभेद दूर केले.  यावेळी बोलताना ना. खोत म्हणाले, विकास आघाडीत कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत. आघाडीतील सर्व नेते विकासकामाला चालना देणारेच आहे. विक्रम पाटील हे आघाडीचे नेते आहेत. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या रुपाने शहराला चांगला चेहरा मिळाला आहे.

ते राजकारण बाजूला ठेवून तळागाळापर्यंत जावून काम करीत आहेत. सर्वांना बरोबर घेवून केवळ विकासच डोळ्यासमोर ठेवून पालिकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळेच शहरातील अनेक कामे मार्गी लागली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. यापुढे दोघेही एकत्रित बसून निर्णय घेतील.  नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, आमच्या दोघांत  मतभेद आहेत. मात्र मनभेद नाहीत.  मतभेद हे जीवंतपणाचे लक्षण आहे. आनंदराव पवार, विक्रम पाटील, वैभव पवार हे आघाडीचे नेते आहेत. आम्ही शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत. निवडणुकीत नागरिकांना दिलेले आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत. कार्यकर्त्यांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यातूनच विक्रम पाटील आक्रमकपणे प्रश्‍न मांडत असतात. यापुढे आम्ही सर्वजण मिळून शहरातील सर्व प्रश्‍न मार्गी लावू. 

विक्रम पाटील म्हणाले, आघाडीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचे आश्‍वासन आम्ही दिले होते. त्याची बर्‍यापैकी पूर्तता सुरू आहे. यापेक्षा जास्त विकास व्हावा हीच भूमिका आमची आहे. काही गोष्टी अनावधानाने, गैरसमजातून होत असतात. बर्‍याच प्रश्‍नावर ना.  सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा झाल्याने  शंकेचे निरसन झाले आहे. विकासासाठी लागणारा निधी देण्याचे आश्‍वासन ना. सदाभाऊ खोत यांनी दिले आहे. ज्या विश्‍वासाने जनतेने आम्हाला निवडून दिले. त्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही, असेही ते म्हणाले.