Sun, Jul 05, 2020 14:51होमपेज › Sangli › विधानसभा पोटनिवडणुकीचा पैरा फेडा

विधानसभा पोटनिवडणुकीचा पैरा फेडा

Published On: Apr 08 2019 2:02AM | Last Updated: Apr 07 2019 10:52PM
सांगली : प्रतिनिधी

पलूस-कडेगावची पोटनिवडणूक काँग्रेसला बिनविरोध करून दिली होती. आता काँग्रेसचा लोकसभेसाठी उमेदवार नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना सहकार्य करून पैरा फेडावा. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी त्यांना समजावण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. अंकलखोप (ता. पलूस) येथे प्रचारबैठकीत ते बोलत होते.

यावेळी संजय पाटील, सरचिटणीस सुरेंद्र चौगुले, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, पंचायत समिती सभापती सीमाताई मांगलेकर, जि. प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर, अश्‍विनी पाटील, नितीन नवले, राजाराम गरुड प्रमुख उपस्थित होते. या सर्वांनी पलूस तालुक्यातील सर्व गावांना भेटी-गाठी, संपर्क दौरा, प्रचारबैठकांद्वारे नागरी संवाद साधला. 
संजय पाटील म्हणाले, विरोधकांकडे टीकेसाठी मुद्दाच नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीने तर या निवडणुकीत अस्तित्व गमावून स्वाभिमानीचा हात धरला आहे. एकेकाळी या सर्वांवर स्वाभिमानीचे नेते टीका करत होते. मात्र आज त्यांच्याबरोबरच  जाण्याची वेळ स्वाभिमानीवर आली आहे. परंतु आपण विरोधकांच्या टीकेऐवजी विकासात्मक निवडणूक लढणार आहोत. 

सुरेंद्र चौगुले म्हणाले, भाजपच्या माध्यमातून पलूस-कडेगाव तालुक्यात प्रचार ते बूथयंत्रणा सज्ज आहे. निव्वळ पलूस तालुक्यातच 142 बूथवर संघटनात्मक बांधणीसाठी साडेतीन हजार कार्यकर्ते नियुक्‍त केले आहेत. तब्बल 17 हजार कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली आहे. विरोधकांकडे बूथला अद्याप माणसेही नाहीत. त्यामुळे संजय पाटील यांना पलूस-कडेगावमधून सर्वाधिक मताधिक्य देऊ, संजय पाटील तुम्ही बिनधास्त रहा.

यावेळी पलूस तालुकाध्यक्ष विजय पाटील, राजकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, शंकर पाटील, भालचंद्र बिरनाळे, रघुनाथ चौगुले, डॉ. जयवर्धन पाटील, सागर सूर्यवंशी,  भिलवडीचे सरपंच विजय चोपडे, अण्णासाहेब चोपडे  उपस्थित होते.

आता एकदिलाने; कोणती खुसपट नको

पृथ्वीराज देशमुख म्हणाले, संजय पाटील व आमच्यातील मतभेद वर्षा बंगल्यावर मिटले आहेत. यापुढे सर्व एकदिलाने काम करायचे आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी कोणतेही किंतु-परंतु खुसपट काढू नये. ही आगामी विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट असून, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना आपल्या मतप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक कार्यकर्त्यांचा लेखाजोखा आणि दैनंदिन कामावर लक्ष आहे.