होमपेज › Sangli › काँग्रेसनेच समाजात विष पेरले : देशमुख

काँग्रेसनेच समाजात विष पेरले : देशमुख

Published On: Apr 09 2018 1:40AM | Last Updated: Apr 09 2018 1:31AMकडेगाव : शहर प्रतिनिधी

सामाजिक सलोख्याच्या प्रश्नावर काँग्रेस उपोषण करत आहे.वस्तुतः त्यांनीच समाजात जाती-जातीत विष पेरण्याचे काम केले आहे, असा आरोप सहकारव जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना केले. माजी भाजपा जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख, बी. के. गायकवाड,  सुभाष घाडगे उपस्थित होते. 

मंत्री देशमुख म्हणाले, सामाजिक सलोखा ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. उलट काँग्रेसच समाजात विष पेरण्याचे काम करत आहे. शिवसेना होणार्‍या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार, याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘शिवसेना  मित्र पक्ष आहे. मिळूनच लढणार आहोत, परंतु प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या पक्ष वाढीच्या भूमिकेतून ते बोलले असतील’. मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, नऊ ऑगस्टरोजी मुंबईत झालेल्या  मराठा क्रांती मोर्चातील अनेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे .

पोटनिवडणुकीबाबत  धोरण नाही

कडेगाव -पलूस मतदारसंघाचे माजी मंत्री आमदार  डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने झालेल्या दुःखाचे सावट अद्याप कायम आहेत .या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र निवडणूक लढविण्याच्या संदर्भात भाजपच्या वरिष्ठपातळीवर कोणतीही चर्चा झालेली नसून याबाबत अद्याप कोणतेही धोरण ठरलेले नाही, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.