Mon, Jul 06, 2020 18:03होमपेज › Sangli › ईव्हीएमविरोधात काँग्रेसचे आंदोलन

ईव्हीएमविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Published On: Jul 18 2019 1:55AM | Last Updated: Jul 17 2019 9:05PM
सांगली : प्रतिनिधी

ईव्हीएमविरोधात काँग्रेसने बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबविली. त्याला शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. हिंमत असेल तर भाजपने निवडणुका बॅलेट पेपर घ्याव्यात. देशभरात ईव्हीएमविरोधात सूर उमटत असताना भाजपला मात्र ही मशिन का हवे आहे, असा सवाल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला.

स्टेशन चौकात हे आंदोलन झाले. काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘ईव्हीएम हटवा, देश वाचवा’,  ‘विजय भाजपचा नव्हे; तर ईव्हीएमचा’, अशा घोषणा देण्यात आल्या. येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांनी वाहने थांबवून स्वाक्षर्‍या केल्या. काहींनी ईएव्हीएमला तीव्र विरोध असल्याचे सांगितले. या वेळी कार्यकर्त्यांनी  ईव्हीएमला जोडा मारो करून चप्पलांचा हार घातला.  बॅलेट पेपरला हार घालण्यात आला. अपंगांनी रांगेने येऊन सह्या केल्या. 

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जतचे विक्रम सावंत म्हणाले, ईव्हीएम  हॅक करता येते. हे अनेकवेळा सिध्द झाले आहे.  त्यामुळेच परदेशात निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जात आहेत. सार्‍या देशातील सामान्य नागरिक व अनेक तज्ज्ञ, विचारवंत, राजकीय नेते ईव्हीएमला विरोध करीत आहेत.   त्यामुळे संशय आणखीच वाढला आहे. हिंमत असेल तर भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन त्या जिंकून दाखवाव्यात. 

आंदोलनात पी. एम. पाटील, संतोष पाटील, मुफीत कोळेकर, सचिन चव्हाण, बिपीन कदम, रविंद्र खराडे, सुभाष खोत, उत्तम कांबळे, विद्या कांबळे, सनी धोतरे, संजय शहा, रफीक शेख, शमशाद नायकवडी, जावेद शेख, इरफान मुल्ला, डॉ. मॅन्युयल डिसुझा, विलास बेले, खुद्दबद्दीन मुजावर, लतीफ मुजावर, बी. बी. चेटकरी, बिजली जुबेदा, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.