Tue, Jul 14, 2020 04:33होमपेज › Sangli › काँग्रेस इच्छुकांची झुंबड

काँग्रेस इच्छुकांची झुंबड

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:33PMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी काँग्रेसने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. बहुतेक इच्छुकांनी जोरदार शक्‍तीप्रदर्शन करीत उमेदवारीवर दावा केला. कच्छी भवन येथे या मुलाखती सकाळ व  दुपार अशा दोन टप्प्यात पार पडल्या. यासाठी माजी मंत्री व आमदार सतेज पाटील, आमदार विश्‍वजित कदम, काँग्रेस नेत्या  जयश्री पाटील, माजी  मंत्री प्रतीक पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अभय छाजेड, विशाल पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी दहा वाजता मुलाखती सुरू झाल्या. दुपारी दोन वाजेपर्यंत प्रभाग 9 पासून ते 12 पर्यंत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.  दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उर्वरित प्रभागातील मुलाखती झाल्या. यासाठी इच्छुकांनी जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले. अनेकजण वाजत-गाजत कार्यकर्त्यांबरोबर मोटारसायकल  रॅली काढून मुलाखतीस्थळी आले. कार्यक्रमाच्या ठिकाणीही इच्छुकांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी केली. 

भगवे, पिवळे फेटे, टोप्या घालून अनेकांनी आपल्या प्रभागातील उमेदवारांचे समर्थन केले. विशेषत: महिलांची गर्दी मोठी होती. प्रचंड झालेली गर्दी नेत्यांना आवरणे कठीण झाले. हॉलमध्ये व बाहेर मोठी झुंबड उडाली. त्यामुळे काहीकाळ गोंगाट व गोंधळ उडाला. काही पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन गर्दीला शांत केले. इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांना शांत करावे, असे आवाहन केले. 

त्यानंतर प्रत्येकाने आपली उमेदवारी कशी योग्य आहे, हे पक्षाच्या पदाधिकार्‍यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी नव्या चेहर्‍याला संधी देण्याबरोबर घराणेशाहीला स्थान देऊ नये, अशी मागणी केली. नेत्यांनी योग्य उमेदवारांना न्याय नाही दिला तर पक्षाला मोठा फटका बसेल, असेही अनेकांनी सांगितले. काही प्रभागातील उमेदवारांनी पक्षाने कोणालाही उमेदवारी द्यावी, त्याचे काम निष्ठेने करू, असे सांगितले. 

गर्दीमुळे नेत्यांत उत्साह : एकजुटीने लढण्याचा निर्धार 

मुलाखतीला मोठी गर्दी होईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटले नव्हते.  मुलाखतींचे केवळ सोपस्कर उरकून जायचे, असा अनेक नेत्यांचा बेत होता. पण गर्दी पाहून नेत्यांमध्येही उत्साह संचारला. सर्वच नेत्यांनी शेवटपर्यंत थांबून  प्रत्येकांचे म्हणणे गंभीरपणे ऐकून घेतले. निष्ठावंतांना संधी देणार असल्याचे सांगितले.  मतभेद विसरून आम्ही ही निवडणूक  एकजुटीने लढणार असल्याचे सर्वच नेत्यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांनी  एकजूट  ठेवण्याचे आवाहन केले.

मिरजेतील मुलाखती आज होणार 

सांगलीसह कुपवाडमधील विविध प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. आज रविवार, दि. 1 जुलैरोजी मिरजेतील इच्छुकांच्या मुलाखती  दोन टप्प्यात होणार आहेत. पटवर्धन हॉलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 तर  दुपारी 3 ते सायंकाळी  5 वाजेपर्यंत या मुलाखती चालणार आहेत.  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री व आमदार सतेज पाटील, आमदार विश्‍वजित कदम, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, प्रतीक पाटील, किशोर जामदार हे या मुलाखती घेणार आहेत.